अहमदनगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 297वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगरमधील चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांनी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा जन्मोत्सव सोहळा होणार आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही आज चौंडीत होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमावरुन आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय सामना रंगताना दिसून येत आहे. यावेळी राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
राम शिंदे म्हणाले, कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक नेते आणि मान्यवरांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या जयंतीला आमदार रोहित पवारांकडून राजकीय स्वरूप देण्यात आले असून हा जयंती उत्सव नसून राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा आहे. दरम्यान, अहिल्यादेवी भक्तांची कुचंबना होतेय, या जयंतीला राजकीय स्वरूप देणे चुकीचे आहे. प्रशासनावर राजकीय दबाव देण्यात येत असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज चौंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सुद्धा चौंडी येथे पोहोचणार आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोप आज चौंडीत होणार आहे. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी शरद पवार आणि गोपीचंद पडळकर हे आमने-सामने येऊन राजीकय संघर्ष होण्याची चिन्ह आहेत.