मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर राज्यातील राजकारण तापलेले पाहायला मिळाले. दरम्यान, शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरचा दौरा केला. दरम्यान, यासर्व मुद्दयावर बोलताना भाजपाचे आमदार नितेश राणे यांची जीभ घसरली आहे. पत्रकारपरिषदेमध्ये संजय राऊतांवर टीका करताना नितेश राणेंनी राऊत यांची तुलना शाहू महाराजांच्या कुत्र्याशी केली आहे.
कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या नितेश राणेंनी सोमवारी सांयकाळी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांना संजय राऊतांनी केलेल्या कोल्हापूर दौऱ्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना नितेश राणेंनी संजय राऊत आता छत्रपतींच्या घरामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये आग लावण्याचे काम करणाऱ्या लोकांमध्ये संजय राऊतही होते असा आरोपही त्यांनी केला.
संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत अशा लोकांना सुरक्षारक्षकांची गरज नाही असे म्हटले. पुढे बोलताना, “हा काल ठाकरेंच्या घरात आग लावत होता आज छत्रपतींच्या घरापर्यंत पोहचण्याची याची मजल गेली आहे. म्हणून कधीतरी त्यांच्या आजूबाजूच्या बॉडीगार्डला १० मिनिटं सुट्टी दिली पाहिजे किंवा सुट्टीवर पाठवा. अशा लोकांना अंगरक्षकांची गरज नाही. थोडा मराठा समाजाने त्याचा ताबा घेतला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या घरी त्याने आग लावली आज छत्रपतींच्या घरी आग लावलेली आहे,” असे नितेश राणे म्हणाले आहेत. “हा जो आग लावण्याचा इतिहास आहे. ही आग लावण्याची हिंमत संजय राऊत करतोय हे कधी ना कधीतरी त्याला मोजायला लागणार हे मी तुम्हाला नक्की सांगतो,” असेही नितेश राणेंनी म्हटले आहे.
नितेश राणे यांनी खासदार असणाऱ्या संजय राऊतांची तुलना शाहू महाराजांच्या श्वानाशी केली. “शाहू महाराजांचं मी खरंच कौतुक करीन की त्यांनी अतिशय योग्य जागी त्यांनी संजय राऊतांना बसवलं. कसंय एका बाजूला त्यांचा कुत्रा बसलेला दुसऱ्या बाजूला संजय राऊत बसलेला. बरोबर जागी त्यांना ते स्थान बरोबर दिलं. एक त्याचा पालतू होता. दुसरा कोणाचा पालतू आहे उभ्या महाराष्ट्राला माहितीय. कोणाच्या बिस्कीटावर नाचतो तो. म्हणून त्यांनी बरोबर स्थान दिलं त्याला,” असे नितेश राणे राऊत यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले.