चंदिगड: पंजाबमधील पतियाला जिल्ह्यात निहांग शीखांनी केलेल्या हल्ल्यात एका पोलीस उपनिरीक्षकाचा हात कापला गेला आणि अन्य दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले. संचारबंदी लागू असताना घाऊक भाजी मंडईमध्ये खरेदीसाठी आलेल्या या शीखांना पोलिसांनी संचारबंदी काळातील पासची विचारणा केली होती. त्यानंतर या शीखांनी तलवारींनी पोलिसांवर हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले.
ही घटना पहाटे सव्वा 6 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर पोलिसांनी 7 जणांना जवळच्याच बालबेरा गावातल्या गुरुद्वारामधून अटक केली. त्यामध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 5 जणांचाही समावेश आहे.
करोनामुळे लॉकडाऊन जारी केलेला असल्यामुळे भाजी मंडईच्या बाहेर पोलिसांनी अडथळे उभे केलेले आहेत. संचारबंदीच्या काळात पोलिसांकडून देण्यात आलेल्या “कर्फ्यू पास’शिवाय अन्य कोणालाही या मंडईमध्ये प्रवेश दिला जात नाही.
पहाटेच्या सुमारास निहांग शीखांच्या 4-5 जणांच्या गटाने या वाहनासह मंडईमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पास मागितल्यावर गेटला वाहनाची धडक देऊन त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. हल्ल्यानंतर ते तेथून पळून गेले. हल्ल्यामध्ये जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक हरजीत सिंग यांना प्रथम राजेंद्र हॉस्पिटलमध्ये आणि नंतर चंदिगडमधील पीजीएमईआरमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात आहे. या हल्ल्यामध्ये सदर पटियाला स्टेशनचे हाऊस ऑफिसर आणि अन्य एक अधिकारीही जखमी झाले.
पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी ही दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे. जखमी पोलीस उपनिरीक्षकावर प्लॅस्टिक सर्जरी करण्याच्या सूचना आपण दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.