बेळगाव : राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. मुंबई, पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असताना कोरोनाने ग्रामीण भागातही हातपाय पसरायला सुरवात केली आहे. बेळगाव शहरात आज नवे ४ कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील एक जण दिल्लीत झालेल्या तबलिगी कार्यक्रमात जाऊन आला होता. त्याच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळते आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांचा पोलीस तपास घेत आहेत. हे ४ रुग्ण रायबाग कुडीची परिसरातील असल्याची माहिती मिळते आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात मागील २४ तासात ९०९ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर २ हजार अहवाल अजून येणे बाकी आहे. मागील २४ तासात कोरोना विषाणूमुळे ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे २७३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर, आतापर्यंत भारतात कोरोनाबाधितांची संख्या ८ हजार ३५६ वर पोहचली आहे. त्यापैकी ७ हजार ३६७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासामध्ये १३४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी सर्वाधिक ११३ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ८९५ वर पोहचली आहे. मागील २४ तासात मालेगाव, नागपूर, मुंबई, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे, वसई आणि विरारमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.