औरंगाबाद – एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ अटक केली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी या उपनिरीक्षकाने लाच मागितली होती. अश्पाक शेख असे लाच स्वीकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून तो जिन्सी पोलीस ठाण्यात कार्यरत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी दोन व्यावसायिक भागीदारांपैकी एकाविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास शेख यांच्याकडे होता. या प्रकरणातील साक्षीदारांनाही आरोपी करण्याच्या धमक्या देत त्याने लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यानंतर मे महिन्यातच एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली होती. तेव्हाच अश्पाक शेखने एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून तो वेगवेगळी कारणे देत लाच घेणे टाळत होता. प्रत्येकवेळी सापळा पुढे ढकलला जाई मात्र अखेर काल शुक्रवारी एसीबीच्या पथकाने त्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. शहागंज भागात शुक्रवारी (14 जुलै) रोजी रात्री 9 वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, जिन्सी पोलीस ठाण्यातून आठ दिवसांपूर्वी त्याला विशेष पथकात बढती देण्यात आली होती.
जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यांपूर्वी दोन व्यावसायिकांमध्ये वाद झाला होता. यापैकी एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक अश्पाक शेख याच्याकडे देण्यात आला होता. अश्पाक हा साक्षीदारांनाही आरोपी करण्याच्या धमक्या देत होता. तसेच कारवाई आणि अटक टाळण्यासाठी त्याने एक लाखाची लाच मागितली होती. पण तक्रारदाराने लाचचुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतल्याने त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे.