कराची – पाकिस्तानच्या अध्यक्षपदासाठीचे विरोधी पक्षांचे उमेदवार आणि ज्येष्ठ राजकीय नेते महमूद खान अचकझाई यांच्या घरावर पोलिसांनी छापा घातला आहे. बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टा येथे सरकारी मालकीचा भूखंड अचकझाई यांनी बेकायदेशीरपणे बळकावल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
अचकझाई हे बलुचिस्तानमधील मिल्ली आवामी पार्टीचे प्रमुख असून इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने पाठिंबा दिलेले विरोधकांचे अध्यक्षपदासाठीचे उमेदवार आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आसिफ अली झरदारी यांच्याविरोधात त्यांनी अर्ज दाखल केला आहे.
संसदेमध्ये ९ मार्च रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अचकझाई यांना सुन्नी इत्तेहादुल कौन्सिलचाही पाठिंबा असणार आहे. अध्यक्षपदाच्या प्रमुख विरोधी उमेदवारावरच पोलिसांनी छापा घातल्यावर पाकिस्तानातील बहुतेक सर्व विरोधी राजकीय नेते, नागरी हक्क विषयक कार्यकर्ते तसेच प्रसार माध्यमांनी जोरदार टीका केली आहे.
संसदेमध्ये शेहबाझ शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड झाली, त्यावेळी अचकझाई यांनी संसदेत केलेल्या भाषणाची प्रतिक्रीया म्हणूनच त्यांच्यावर हा छापा घालण्यात आल्याची टीका होऊ लागली आहे.
अचकझाई यांनी आपल्या घरासाठी सरकारी मालकीचा २.५ कनाल (०.३ एकर) इतका भूखंड बेकायदेशीरपणे बळकावला असल्याचा आरोप असल्यामुळे हा छापा घालण्यात आल्याचे क्वेट्टाचे पोलीस उपायुक्त साद असाद यांनी सांगितले. अचकझाई यांनी या भूखंडावर कुंपण घातले असून वारंवार इशारा देऊनही त्यांनी हा भूखंड रिकामा केला नव्हता. त्यामुळे पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचार् यांनी हा भूखंड पुन्हा ताब्यात घेतल्याचेही असाद म्हणाले.
छाप्याच्यावेळी काही सशस्त्र सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला होता. सहायक आयुक्तांच्या कामात अडथळा आणल्याबद्दल या सशस्त्र सुरक्षा रक्षकांना अटक केली गेली आहे, असेही असाद म्हणाले. मिल्ली आवामी पार्टीचे सरचिटणीस अब्दुल रहिम झियारतवाल यांनीही या छाप्यावर जोरदार टीका केली.
या छाप्याच्या निषेधार्थ देशभर आंदोलन आणि निदर्शने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा कारवाईमुळे निवडणुकीतील गैरप्रकारांविरोधात निषेध करण्यापासून परावृत्त केले जाऊ शकणार नाही, असेही झियारतवाल यांनी सांगितले.