पुणेः पोलिसांच्या प्रेमापोटी पुण्यात अत्यंत साध्या पद्धतीचे पोलिस विश्रांती कक्ष साकारत आहे. महाराष्ट्रातील पोलिसांसाठी असा पहिलाच उपक्रम आहे, अशी माहिती कुडजे गावचे पोलिस पाटील दत्ता पायगुडे यांनी दिली.
पोलिस पाटील दत्ता पायगूडे हे पुणे शहरातील उत्तमनगर पोलिस स्टेशनच्या अतंर्गत काम करतात. पायगुडे यांनी, करोना काळात त्यांनी कोरोना योद्धा म्हणून काम केले आहे.
याबाबत माहिती देताना पायगुडे म्हणाले, ‘मी महाराष्ट्र पोलिसांचा खूप आदर करतो. पुणे शहरात पोलिस आयुक्त आयपीएस अमिताभ गुप्ता तसेच पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक आयपीएस अभिनव देशमुख या दोघांनाही मी आदर्श मानतो. दोघेही पोलिस अधिकारी सिंघम स्टाईलने काम करत असल्यामुळेच आज पुणे सुरक्षित आहे. त्यांनी पुणे पोलिसांना एका ठराविक उंचीवर नेऊन ठेवले आहे. मी महाराष्ट्र पोलिसांचा गावपातळीवरील शेवटचा घटक असून, पोलिसांविषयी असलेला आदर आणि प्रेमापोटीच मी माझ्या घराशेजारी हा विश्रांती कक्ष बांधला आहे.’
‘उन्हाळ्याचे दिवस सुरू होतील. गावाकडे खूप ऊन असते. उन्हाळ्यामध्ये तपास किंवा इतर कामांसाठी माझ्या गावात भेटीसाठी येणारे पोलिस तथा इतर अधिकारी उन्हामुळे अक्षरशः थकलेले असतात तेव्हा त्यांनी या विश्रांती कक्षात थांबून चाहापणी घेऊन क्षणभर विश्रांती करावी एवढाच हेतू आहे. विश्रांती कक्ष एकदम जुन्या पद्धतीने बांधत माती लाकूड आणि गवताचा वापर केला आहे. छतावर गवत टाकले आहे तसेच माती आणि लाकडापासून भिंती बांधल्या आहेत आणि खालची जमीन गाईच्या शेणाने सारवली आहे. एका वेळी कमीत कमी दहा ते पंधरा जण बसू शकतील एवढी जागा आहे. हा कक्ष बांधण्यासाठी आत्तापर्यंत वीस ते तीस हजार रुपये खर्च झाले आहेत. अजून थोडे काम बाकी असून थोड्याच दिवसांत हा कक्ष पोलिसांच्या सेवेसाठी खुला करण्यात येईल,’ असे पोलिस पाटील दत्ता पायगुडे यांनी सांगीतले.