मंचर -श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मंजूर असलेल्या पोलीस चौकीसाठी एक पोलीस अधिकारी आणि सहा पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले, असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी दिली.
कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर (ता.आंबेगाव) येथे घेतलेल्या आढावा बैठकीत भीमाशंकर पोलीस चौकीसाठी कर्मचारी नेमण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे व आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने टोम्पे यांनी पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव आणि इतर सहा कर्मचाऱ्यांची भीमाशंकर पोलीस चौकीसाठी नेमणूक केली आहे.
मंत्री वळसे पाटील यांनी सांगितले होते की, 20 फेब्रुवारी 2012 ला महाशिवरात्रीची पूजा माझ्या हस्ते झाल्यानंतर रात्री दोन वाजता तत्कालीन पोलीस अधीक्षक शहाजी सोळुंके यांच्या हस्ते या चौकीचे उद्घाटन झाले होते. चौकीसाठी एक अधिकारी व बारा कर्मचारी मंजूर आहेत. मात्र, येथे कर्मचाऱ्यांची नेमूणक केली जात नव्हती. चौकीमुळे भीमाशंकर परिसरातील तक्रारीसाठी नागरिकांना घोडेगावपर्यंत जाण्याची गरज पडणार नाही. मंदिर बंदोबस्तासाठी देखील या पोलिसांचा उपयोग होईल.