पिंपरी – पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मोरवाडी, पिंपरी येथे गुरुवारी (दि. 26) पहाटे दीडच्या सुमारास मोरवाडीत उघडकीस आली.
अभिषेक अजित दळवी (वय 29) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. मयत अभिषेक हा आई आणि पत्नीसह मोरवाडी येथे राहत होता. तर वडील अजित दळवी हे सांगली जिल्ह्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. एक वर्षापूर्वी अभिषेकचे लग्न झाले आहे. बुधवारी रात्री अभिषेकने मद्यपान केल्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याने बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून घेतला. बराच वेळ झाला तरी त्याने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे आई आणि पत्नीने दरवाजा उघडण्याची विनंती केली.
मात्र, आतून काहीही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर त्याच्या चुलत भावाला बोलावून दरवाजा उघडण्यास सांगितले. त्याने पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना बोलावले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडला असता अभिषेक पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.