मुंबई – दोन बेस्ट बसमध्ये चिरडून पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मुंबईतील न्यू माॅडर्न स्कूलजवळील वाकोला मशीदीजवळ घडली. प्रवीण दिनकर (वय 43) असे अपघातात मृत्यू पावलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. दिनकर यांच्या अपघाती मृत्यूने कुंटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिनकर हे मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण दिनकर हे पोलिस लाइन सांताक्रूझ येथे रहायला होते. ते शुक्रवारी सकाळी घरून निघाले असता न्यू माॅडर्न स्कूलजवळ वाकोला मशीदीजवळ त्यांचा अपघात झाला. समोर बेस्ट बसमधून प्रवासी उतरत होते म्हणून दिनकर हे बसच्या मागे थांबले होते. तेवढ्यात पाठिमागून आलेल्या बेस्ट बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि दोन बेस्ट बसच्या मध्ये चिरडून दिनकर यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डाॅक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
दरम्यान, अपघातप्रकरणी पाठिमागील बेस्ट बस चालकावर वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी सुरु आहे. दिनकर हे मूळचे नगर जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने पोलिस ठाण्यातील सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.