अमरावती – पोलीस मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बाळकृष्ण राठोड (वय 50) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. दरम्यान काल बुधवारी (दि. 11 मे) वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय किसनराव अडोकार (54, रा. गगलानीनगर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दोन दिवसांत दोन पोलिसांच्या झालेल्या आत्महत्येने अमरावती पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण राठोड हे दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांनी गुरुवारी (12मे) पोलीस मुख्यालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेत राठोड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. राठोड यांचा मृतदेह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, बुधवारी वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक अडोकार यांनी आत्महत्या केली होती. घरापासून काही अंतरावर एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला होता. अडोकार यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, बदली करण्याची मागणी पूर्ण न करता निलंबनाची धमकी देत पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह व वलगावचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांनी नाहक त्रास दिला. त्यामुळेच विजय यांनी हा आत्मघाती निर्णय घेतला.