प्रशांत जाधव
सातारा – जिल्हा पोलीस दलाच्या मुख्यालयाच्या परिसरातील पोलीस वसाहतीच्या पुनर्विकसाचे काम प्रगतिपथावर असून, मुख्यालयाच्या मागील बाजूच्या वसाहतीपासून सातारा तालुका पोलीस ठाण्याजवळच्या भूखंडावर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तीनमजली इमारती उभारण्याचे काम सुरू आहे. या वसाहतीत एक किंवा दोन खोल्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहणाऱ्या पोलीसदादांना आता प्रशस्त 698 “वन बीएचके’ सदनिका मिळणार आहेत.
जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी गोडोलीतील गोळीबार मैदान, पोलीस मुख्यालयाची मागील बाजू आणि कारागृहाच्या मागे पोलीस वसाहती आहेत. मात्र, यातील दोन वसाहतींची कित्येक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वसाहती मोडकळीस आल्या आहेत. येथे पोलीस कर्मचाऱ्यांची कुटुंबे जीव मुठीत धरून रहात असल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी पुढाकार घेतला होता.
पोलिसांचे चांगल्या घरांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यामुळे पोलीस गृहनिर्माण अंतर्गत पोलीस मुख्यालयालगतच्या वसाहतींच्या पुनर्विकासाला भाजप सरकारच्या काळात गेल्या वर्षी सुरुवात झाली. या इमारतींच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम काम अत्यंत झपाट्याने पूर्ण झाले आहे.
बारा इमारतींमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी साडेसहाशे चौरस फुटांचे “वन बीएचके’ फ्लॅट बांधण्यात येत आहेत. एकूण 672 फ्लॅट असून प्रत्येक इमारतीचा दुसरा स्लॅब नुकताच टाकण्यात आला. दोन इमारतींमध्ये “टू बीएचके’चे 24 तर अधिकाऱ्यांसाठी दोन “थ्री बीएचके’ फ्लॅट असतील. नाशिक येथील कंपनी हा प्रकल्प उभारत असून मार्च 2021 पर्यंत या इमारतींचे बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
बहुद्देशीय हॉल आणि बरेच काही
बैठ्या चाळीवजा पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलीसदादांना आता पुणे, मुंबईच्या धर्तीवरील सदनिकांमध्ये राहायला मिळणार आहे. पुनर्विकसित होणाऱ्या पोलीस वसाहतीत प्रशस्त सदनिकांबरोबर 18 हजार 700 चौरस फुटांचा बहुद्देशीय हॉल बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या मुलांसाठी अडीच हजार चौरस फुटांची अभ्यासिका बांधण्यात येणार आहे.