राजगुरूनगर – निमगाव येथे कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आलेल्या आळेफाटा (ता. जुन्नर) येथील भाविकाला हृदयविकाराचा झटका आला. तेथे ड्युटीला असलेल्या खेड पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले पुढील उपचारासाठी पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये तत्परतेने दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले.
निमगाव येथे खंडोबा मंदिरात श्री खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी आळेफाटा (ता. जुन्नर ) येथील प्राचार्य केशव नामदेव बोरकर (वय 53) त्यांची मुलगी तन्वी बोरकर, मुलगा उपेंद्र बोरकर रविवार (दि. 10) आले होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रांगेत उभे राहून मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी गेले होते. दरम्यान बोरकर यांना अचानक चक्कर येऊन गाभाऱ्यातील फरशीवर कोसळले. तोंडातून फेस येऊन बेशुद्ध पडले. या घटनेमुळे भाविकांची पळापळ झाली. गाभाऱ्यातील पुजारी भाविक, बोरकर यांचा मुलगा, मुलगी घाबरून गेल.
दरम्यान, त्या ठिकाणी बंदोबस्त करीत असलेले खेडचे पोलीस हवालदार मोहन अवघडे, सचिन गिलबिले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गाभाऱ्यातील भाविकांची गर्दी हटवली. तसेच बेशुद्ध अवस्थेत असलेल्या बोरकर यांच्या छातीवर 10 ते 15 मिनटे पंपीग केले. त्यांनी फोन करून तात्काळ खासगी वाहन बोलवून राजगुरूनगर येथील जीवनरक्षक हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल केले. बोरकर यांची प्रकृती सद्या स्थिर असून पोलीस हवालदार मोहन अवघडे आणि सचिन गिलबिले यांनी तात्काळ मदत केल्याने प्राचार्य बोरकर यांचे प्राण वाचले.
उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते, खेडचे निरीक्षक सतीश गुरव, पोलीस हवालदार संतोष घोलप, निमगावचे पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे पाटील, खंडोबा देवस्थान ट्रस्ट्रीचे अध्यक्ष बबन शिंदे, निमगावचे माजी सरपंच अमर शिंदे पाटील यांनी कौतुक केले.