राजगुरूनगर – खेड पंचायत समितीच्या उपसभापती शिवसेनेचे अमर कांबळे हे 10 मतांनी निवडून आले. विशेष म्हणजे शिवसेना विरोधी शिवसेना अशी निवडणूक झाली. खेड पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक मंगळवारी (दि. 12) खेड पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक पीठासीन अधिकारी तथा खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली.
या निवडणुकीला पंचायत समितीचे 14 पैकी 12 सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात सामील झालेले शिवसेनेचे अमर कांबळे यांनी उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरला तर शिवसेनेचे मच्छिंद्र गावडे यांनी शिवसेनेच्या आदेशाने उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी तीन वाजता विशेष सभा झाली. यामध्ये हात वर करून उपसभापती पदासाठी मतदान घेण्यात आले. यात अमर कांबळे यांना 10 तर मच्छिंद्र गावडे यांना 2 मते मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी उपसभापती पदावर अमर कांबळे हे निवडून आल्याचे जाहीर केले. उपसभापती निवडीसाठी सभापती अरुण चौधरी, सदस्य अंकुश राक्षे, चांगदेव शिवेकर, ज्योतीताई अरगडे, सुभद्रा शिंदे, मच्छिंद्र गावडे, मंदाबाई शिंदे, नंदाताई सुकाळे, वैशाली जाधव, सुनिता सांडभोर हे उपस्थित होते. तर भगवान पोखरकर, अमोल पवार हे दोन सदस्य गैरहजर होते. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार संतोष चव्हाण यांनी काम पाहिले.
दरम्यान निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील, वर्षाराणी घाटे यांच्यासह खेड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, होमगार्ड, दंगा काबू पथकाचे जवान तैनात करण्यात आले होते. निवडणूक शांततेत झाली.
बंडखोर, शिवसेना सदस्यांमध्ये कलगीतुरा सुरूच
खेड पंचायत समितीमध्ये मागील 101 दिवसांच्या महानाट्यानंतर सभापती पदाची निवडणूक झाली होती, यात राष्ट्रवादीच्या अरुण चौधरी याना संधी मिळत पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता आली. दरम्यान, राष्ट्रवादी सोबत शिवसेनेचे पाच आणि भाजपचा एक सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्यात ठरल्यानुसार भाजपचे चांगदेव शिवेकर यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीच्या गोटात आलेल्या शिवसेनेच्या अमर कांबळे यांना संधी देण्यात आली आहे. ठरल्यानुसार काही कालावधीनंतर सभापती, उपसभापती पदावर इतर सदस्यांना संधी देण्याचे ठरले आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेना बंडखोर सदस्य व शिवसेना सदस्य यांच्यातील राजकीय कलगीतुरा सुरू राहणार आहे.
प्रथमच आंबेडकर चवळीतील व्यक्तीला संधी
अमर कांबळे यांची उपसभापती पदावर निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी भव्य मिरवणूक काढली. खेड पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच आंबेडकरी चळवळीतील व्यक्तीला उपसभापती पदाची संधी मिळाली आहे.
“निवडणुकीनंतर नवनिर्वाचित उपसभापती अमर कांबळे म्हणाले, सर्व सहकारी सदस्यांच्या एकमताने मला उपसभापती पदावर निवडून दिले आहे. आगामी काळात त्यांच्या त्यांना बरोबर घेऊन तालुक्यातील विकासकामांना महत्त्व देऊन सर्वसामान्य नागरिकांची कामे प्रश्न मार्गी लावले जातील.”
– अमर कांबळे, नवर्निवाचित सभापती, खेड पंचायत समिती
“आमच्या एका सहकारी सदस्याने शब्द पाळले नाहीत त्यामुळे गेली 101 दिवस आम्हाला आणि जनतेला त्रास सहन करावा लागला. आमदार मोहिते यांची सत्ता पंचायत समितीत आली. त्यांनी ठरवले असते तर पुन्हा उपसभापती राष्ट्रवादीचा झाला असता; मात्र सदस्यांच्या निर्णयानुसार आम्ही निर्णय घेतला. तीन पक्ष एकत्र येऊन खेड पंचायत समितीचा कारभार सुरू आहे. यात पक्षीय जोडे बाजूला ठेवून आम्ही काम करीत आहोत. आगामी काळात विकासकामे करताना एकीने काम करू.”
– अंकुश राक्षे, माजी सभापती