नवी दिल्ली – उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातल्या 152 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे पदक देऊन गौरव करण्यात आला. पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेतली जावी, या हेतूने 2018 साली केंद्र सरकारने हे पुरस्कार सुरू केले.
ही पारितोषिके मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या एकूण 15 जणांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील 11, गोवा पोलिस दलातील 1 आणि गुजरातच्या पोलीस दलातील 6 अधिकाऱ्यांनी हे पदक मिळविले आहे.
तसेच या मानकऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशातील 10, केरळ आणि राजस्थानातील प्रत्येकी 9, तामिळनाडू पोलीस दलातील 8 आणि बिहारचे 7, कर्नाटक आणि दिल्ली पोलिसांतील प्रत्येकी 6 आणि इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील पदकप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये 28 महिला पोलीस अधिकारी देखील समाविष्ट आहेत.