इंदूर – आठ वर्षांच्या सुखी वैवाहिक जीवनानंतर पतीला समजले की पत्नीचे दुसऱ्या कुणावर
तरी प्रेम आहे. अशा स्थितीत त्याने अजिबात विचलीत न होता, आदळआपट न करता शांतपणे
निर्णय घेतला. पत्नीचा प्रियकर अविवाहित होता. त्यामुळे पत्नीला त्याच्याशी लग्न करता यावे
यासाठी पतीने शांतपणे पत्नीला घटस्फोट दिला. एवढेच नव्हे तर त्यांच्या पाच वर्षांच्या
मुलीचा ताबाही पत्नीकडे दिला.
इंदूरमधील कौटुंबिक न्यायालयातील या अनोख्या आणि विचित्र वाटणाऱ्या प्रकाराची सध्या
शहरात चर्चा सुरु आहे. पती-पत्नी दोघेजण परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी कौटुंबिक
न्यायालयात पोचले तेव्हा न्यायालयाने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघे
त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याने न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला.
इंदूरमधील 28 वर्षांची महिला आणि तिच्या पतीची ही कहाणी आहे. 2012 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यांना पाच वर्षांची एक मुलगी आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी पतीला समजले की, त्याच्या पत्नीचे दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे. ही गोष्ट समजल्यावर त्याने पत्नीला त्या तरुणाशी लग्न करण्यास सांगितले.
त्या महिलेचे कुटुंबिय आणि त्याच्या सासुरवाडीच्या लोकांनी दोघांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या पालनपोषण कसे होणार हा प्रश्न पुढे केला. एवढेच नव्हे तर पत्नीने वेगळे रहावे असे सुचवले. परंतु त्याची पत्नी घटस्फोट घेऊन प्रियकराबरोबर नव्याने संसार सुरु करण्यावर ठाम होती.
एकमेकांसमवेत राहण्याची शक्यता दिसत नसल्याने दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. इंदूरच्या कुटुंब न्यायालयात अॅडव्होकेट मनोज बिनीवाले यांच्यामार्फत दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यावेळी न्यायाधीशांसमोरच त्याच्या पत्नीने सांगितले की, तिचे दुसऱ्यावर प्रेम आहे आणि त्याच्याशी संबंध देखील आहेत.
त्यावर पतीने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी तयार असल्याचे सांगितले. न्यायालयाने दोघांचे म्हणणे ऐकून घेऊन घटस्फोटमान्य केला. पाच वर्षांच्या मुलीचा ताबा आईकडेच राहणार असून वडील तिला पाहिजे तेव्हाभेटू शकणार आहेत.