नवी दिल्ली : रक्त गोठवून टाकणाऱ्या थंडीत हजारो भारतीय विद्यार्थी पोलंडच्या सीमांवर अडकून बसले आहेत. त्यांनी केलेल्या फोन आणि मेसेजला भारतीय दुतावासाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना होती. मात्र यावर आता तोडगा निघाला आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तेथून बाहेर पडण्यासाठी व्हिसाशिवाय आपल्या देशामध्ये प्रवेश करण्यास पोलंडने परवानगी दिली आहे. पोलंडचे भारतातील राजदूत ऍडम बुराकोव्सकी यांनी टिविटरवरून ही माहिती दिली आहे. रशियाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी भारताच्या सर्व विद्यार्थ्यांना व्हिसाशिवाय पोलंडमध्ये प्रवेशास परवानगी दिली जात आहे, असे त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.
मात्र भारतीय दूतावासाशी कोणताही समन्वय साधल्याशिवाय युक्रेनची कोणतीही सीमा ओलांडू नये अशी स्पष्ट सूचना भारतीय दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना केली आहे. दरम्यान अमेरिकेनेही भारतीय दूतावासातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना व्हिसासाठीच्या प्रत्यक्ष मुलाखतीतून या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.