राजगुरूनगर -मुलाची दारू सोडविण्याकरिता वडिलांनी बंगाली तांत्रिक बाबाला तब्बल 96 हजार रुपये दिले. दारू मात्र सुटली नाही दरम्यान पैसे घेऊन या बंगालीने पोबारा केला. याबाबत बंगाली बाबा विरुद्ध खेड पोलीस फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 2 मार्च रोजी पंचायत समिती समोरील रस्त्याने जात असताना एक व्यक्ती मिया बंगाली साबरी अशा नावाचे कार्ड प्रभाकर भिकाजी कौदरे (वय 65, रा. राजगुरुनगर) यांच्या हातात देऊन गेला होता. त्यावरील मोबाईल नंबरवर फिर्यादी कौदरे यांनी संपर्क साधून माझ्या मुलाला दारूचे व्यसन आहे. त्यांची दारू सोडवायची आहे.
तुम्ही कुठे राहता असे विचारले. त्यावर बंगाली बाबाने सांगितले की, चांडोली येथील सरकारी दवाखान्याच्या बाजुला मी राहण्यास आहे.
कौदेरे यांनी मिया बंगाली बाबाची भेट घेऊन मुलाची दारू सोडविण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले. तुमचा मुलगा 21 दिवसात दारू सोडेल, त्यासाठी मला 96 हजार रुपये द्यावे लागतील, असे भोंदूबाबाने सांगितले.
यावर कौदेरे यांनी विश्वास ठेवून 96 हजार रुपये दिले. दरम्यान कौदेरे यांच्या मुलाने दारू सोडली नाहीच; मात्र अजून आहारी गेला. 15 मार्च रोजी कौदेरे व त्यांची पत्नी मिया बंगाली बाबाची भेट घेण्यासाठी गेले असता या बाबाने आधीच पोबारा केल्याचे नागरिकांनी सांगितले.