पुणे- पुणे प्रवासी विमानतळावरील नव्या इमारतीचे बांधकाम ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर विमानतळाची प्रवासी हाताळण्याची क्षमता वाढणार आहे.
“भारतीय विमानतळ प्राधिकरणा’च्या (एएआय) पुणे विमानतळावर वर्धित क्षमतेसह आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ज्यामुळे विमानतळावर गर्दी कमी होईल. “एएआय’ने टर्मिनल इमारतीचे बांधकाम 475 कोटी रुपये खर्चून हाती घेतले आहे. यापैकी 55% पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे.
वारसा सांगणारे भित्तीचित्र, प्रतिकृती
नव्या इमारतीत 360 मीटर व्हरांड्यामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचा सामाजिक, ऐतिहासिक, कला, सांस्कृतिक वारसा सांगणारे भित्तीचित्र लावण्यात आले आहे. शिवाय, तेथेच शनिवारवाड्याच्या आतील संरचनेपासून प्रेरित होऊन प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
वाहनतळाचाही प्रश्न सुटणार
येथे 120 कोटी रुपये खर्चासह बहुमजली वाहनतळाचे (तळमजला अधिक तीन मजली आणि दोन तळघर) देखील बांधकाम सुरू आहे. जुलै 2022 पर्यंत ते कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. बहुमजली वाहनतळात 1024 वाहनांची क्षमता असेल आणि जिना, सरकते जिने आणि लिफ्टसह जुन्या इमारतीशी ते जोडले जाणार आहे.
22,300 चौ.मी. टर्मिनलचे सध्याचे क्षेत्रफळ
ऑगस्ट 2023 पर्यंत काम पूर्ण होणार
70 लाख वार्षिक प्रवासी हाताळण्याची क्षमता
5,00,000 चौरस फुटांपेक्षा अधिक : नवे बांधकाम
36,000 चौरस फूट : क्षेत्र प्रवाशांच्या अल्पोपहार/सुखसोयींसाठी राखीव
10 पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज : 72 चेक-इन काउंटर आणि इन-लाइन बॅगेज हाताळणी यंत्रणा