पुणे- मुळा-मुठा नदीकाठ विकसन प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने बोलवलेल्या बैठकीत स्वयंसेवी संस्था तसेच पर्यावरण तज्ज्ञांनी मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित केल्या आहेत. या बैठकीस महापालिका, जलसंपदा विभाग राज्य पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणाचे (सीइआयएए ) प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी उपस्थित होते.
तब्बल पाच तास चाललेल्या या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या आक्षेपावर महापालिका खुलासा करणार असून पुन्हा एकदा बैठक होणार आहे. या बैठकीसजलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पंकज जोशी, सीडब्लूपीआरएसचे डॉ. आर. जी. पाटील यांच्यासह, संस्थांचे प्रतिनिधी सारंग यादवडकर, “जीवित नदी’च्या शैलजा देशपांडे यासह इतर अधिकारी, संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या विषयांवर स्वयंसेवी संस्थाचा आक्षेप
बैठकीत पर्यावरणासंबंधी प्रमुख नऊ आक्षेपांसह इतरही काही प्रश्न उपस्थित करण्यात आले, प्रामुख्याने तज्ज्ञांकडून नदीत केले जाणे कॉंक्रीटीकरण, नदीतील जैव विविधतेचे संरक्षण, बंधारे, बंद होणारे रस्ते, वाहतूक नियोजन, नदीचे खोलीकरण, पूर रेषा, भविष्यातील पूरस्थिती, नदीचा प्रवाह, नदीपात्रातील अतिक्रमणे, प्रकल्पासाठी करण्यात आलेले पर्यवरणीय अभ्यास यासह अनेक प्रश्न उपस्थित करत चर्चा केली. त्यानुसार, काही प्रश्नांबाबत उत्तरे देण्यात आली असली, तरी पालिकेकडून आणखी सविस्तर उत्तरे दिली जाणार आहेत.
राज्यशासनाच्या आदेशनुसार, झालेल्या बैठकीत सर्व घटकांची प्रकल्पाबाबत समाधानकारक चर्चा झाली आहे. सामाजिक संस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर महापालिका पुढील बैठकीत उत्तर देऊन स्वयंसेवी संस्थाचे आक्षेप दूर केले जातील. त्यानंतर त्याचा अहवाल शासनास पाठविला जाईल.
– प्रशांत वाघमारे, शहर अभियंता