कर्मचाऱ्यांची करोनासाठी तात्पुरती नियुक्ती
पिंपरी – लॉकडाउन असल्यामुळे शहरातील पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) सेवा 50 टक्के सुरु आहे. पीएमपीएमएलमधील बाकी कर्मचाऱ्यांना सद्यस्थितीत काही काम नसल्याने त्यांची तात्पुरती नियुक्ती करोना योद्धे म्हणून केली आहे. त्यामध्ये पीएमपीएलचे वाहक, हेल्पर व क्लिनर यांचा समावेश आहे.
‘करोना’ला रोखण्यासाठी मनुष्यबळाचीही आवश्यकता आहे. त्यामुळे पीएमपीकडून तात्पुरत्या स्वरुपात कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये वाहकांची संख्या जास्त आहे. या वाहकांना महापालिकेच्या वायसीएम, भोसरीचे नवीन व जुने रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, सांगवी, यमुनानगर, आकुर्डी या रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली आहे, काही वाहकांची नियुक्ती क्वॉरंटाइन सेंटरमध्ये करण्यात आली आहे. अग्निशामक विभागामध्ये पाच चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दहा कर्मचाऱ्यांना उद्यान विभागाचे काम दिले आहे. निसर्ग चक्रीवादळामध्ये पडलेली झाडे काढण्यासाठी त्यांची मदत घेतली जात आहे.
“पीएमपी’चे कर्मचारी महापालिकेच्या वतीने करोनासाठी काम करण्यासाठी 6 जून रोजी आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार, त्या कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यावेळेस पीएमपीएल सेवा सुरु होईल त्यावेळेस या कर्मचाऱ्यांना तिकडे रुजू व्हावे लागेल. या अटीवर कर्मचाऱ्यांना तात्पुरते नियुक्त करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन करणे कर्मचाऱ्यांना बंधनकारक असणार आहे. जे कर्मचारी या कामासाठी अनुपस्थित राहतील त्यांच्यावर करावाई करण्यात येणार आहे.