कुरकुंभ -अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली हडपसर-कुरकुंभ पीएमपीएलए बसचा शुभारंभ थाटामाटात (दि.24) झाला. मात्र, दोन दिवसांपासून बस कुरकुंभपर्यंत आली नाही. माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते पाटसमध्ये तर कुरकुंभमध्ये भाजप पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुल यांच्या हस्ते कुरकुंभमध्ये बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, दोन दिवसापासून ही बस या मार्गावर धावलीच नाही. ही बससेवा अगोदर वरवंड गावापर्यंत होती आता ती कुरकुंभपर्यंत धावणार होती.
मात्र, बस न आल्याने अनेक प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. फुलांनी सजविलेल्या पीएमपीएल बसचे फटाक्यांच्या आतषबाजीत कुरकुंभमध्ये स्वागत केले होते. महामार्गावरील पाटस टोलनाक्यावर पीएमपीएल बसला टोल आकारण्यात येत आहे. पाटसवरून कुरकुंभकडे जाण्यासाठी हा टोल भरावा लागणार आहे.
हा टोल पीएमपीएलला आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे व्यवस्थापकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, याअगोदरच हे नियोजन आवश्यक होते. कुरकुंभला औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे अनेकजण व्यवसायानिमित्त येत आहेत. त्यामुळे कामगार, व्यावसायिक, विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. ही बस सुरू व्हावी, अशी मागणी प्रवासी करीत आहे. याबाबत पाटस टोल प्लाझाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
पाटसमधील टोल प्लाझावर बसला टोल भरावा लागत आहे. बसला ये-जा करण्यासाठी एकाचवेळी 520 रुपयांचा टोल भरावा लागत आहे. कुरकुंभकडे दिवसभरात चार ते पाच बसेसच्या जास्त फेऱ्या होणार असल्याने हे परवडणारे नाही. याबाबत वरिष्ठ अधिकारी आणि टोल प्लाझाचे अधिकारी यांच्याशी चर्चा सुरू आहे. यातून योग्य तो मार्ग निघून बस सुरू होईल.
-सोमनाथ वाघोले, डेपो मॅनेजर, शेवाळवाडी- हडपसर.