पुणे- राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने जागा रिक्त नसताना अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयात एका अधिकाऱ्याची पदोन्नतीने शिक्षण उपसंचालक पदावर नियुक्ती केली. या पदोन्नती दिलेल्या अधिकाऱ्यांची आता विद्या प्राधिकरणातच बदली होणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्य शासनाने 9 डिसेंबर रोजी राज्यातील 11 अधिकाऱ्यांना विविध कार्यालयात शिक्षण उपसंचालक पदावर पदोन्नत्या दिल्या. यातील काही अधिकाऱ्यांना रिक्त नसलेल्या जागी पदोन्नत्या दिल्याने गोंधळ निर्माण झाला. अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयात पूर्वी शिक्षण उपसंचालक पदाच्या दोन जागा होत्या. त्यातील एक जागा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे (विद्या प्राधिकरण) वर्ग केली आहे. या कार्यालयातील एका जागेवर पूर्वी पासून राजेश क्षीरसागर कार्यरत आहेत. जागा रिक्त नसताना या कार्यालयात निलिमा टाके यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यांना अद्यापही रुजू करुन घेण्यात आलेले नाही. शिक्षण आयुक्त कार्यालयाला पत्र पाठवून मार्गदर्शन सूचना मागविल्या आहेत. शिक्षण आयुक्त कार्यालयाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र अद्याप त्यावर काहीच उत्तर आलेले नाही.
दरम्यान, आता निलिमा टाके यांची विद्या प्राधिकरण किंवा प्राथमिक शिक्षण संचालनालयात बदली होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. कामकाजाच्या दृष्टीने विद्या प्राधिकरण हे निवांत व सोयीचे ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे. विद्या प्राधिकरणात शिक्षण उपसंचालक पदाच्या सात जागा मंजूर आहेत. यातील चार जागा भरण्यात आलेल्या असून तीन जागा रिक्त आहेत. त्यामुळे टाके यांची विद्या प्राधिकरणातच बदली होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येवू लागली आहे.