पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या ‘गो अॅप’चे काम अंतीम टप्यात असल्याचे दोन महिन्यांपूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप अॅप सुरू झाले नसून आणखी किती महिने वाट पहावी लागणार, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
पीएमपी बसचे लाइव्ह लोकेशन देणारी यंत्रणा विकसित करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून गुगल सोबत करार झाला होता. अनेक बैठका झाल्या, प्रायोग झाले मात्र, ही यंत्रणा सुरू होण्याअधीच बंद पडली. आता, पीएमपीने गो अॅपच्या माध्यमातूनच प्रवाशांना विविध सेवा देण्याचा विचार केला. त्यानुसार प्रवाशांना घरबसल्या सध्या बस कुठे आहे, किती वेळात बस बसस्टॉपवर येणार यासह घरबसल्या तिकीट काढण्याची सुविधा या ‘गो अप’च्या माध्यमातून प्रववाशांना सेवा मिळणार आहे.
या ऍपचे सिक्युरिटी ऑडीट सुरू असून महिन्याभरात डेपोमध्ये प्रायोगीक तत्वावर ही सेवा सुरू होणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, दोन महिने झाले, तरी अद्याप अॅप सुरू झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांचा एप्रिल फुल झाले आणखी किती महिने अॅपची वाट पहावी लागणार, की गुगलप्रमाणे या अॅपला तारीख पे तारीख मिळत जाणार, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
असा होणार ऍपचा उपयोग
ऍपच्या माध्यमातून बसची रिअल टाइम माहिती देण्याचे नियोजन आहे. ऍपच्या माध्यमातून प्रवाशांना ज्या बसने जायचे, त्या बसचे शेड्युल पाहून घरबसल्या किंवा कामाच्या ठिकाणावर तिकीट काढता येणार होते. ज्यावेळी बसने प्रवास करणार, त्यावेळी केवळ वाहकाला स्कॅनर दाखवताच तिकीट आपल्या हातात मिळेल. ऍपवर सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म उपलब्ध असतील. पीएमपीच्या सर्व मार्गांची माहितीदेखील यावर मिळणार आहे. बसचे वेळापत्रक आणि पीएमपीचे विविध पास ऍपद्वारे ऑनलाइन काढण्याची सोय आहे.