पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यातून लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली असली, तरी कोणत्याही उमेदवारांकडून अद्याप जाहीर मेळावे, तसेच सभांद्वारे प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यातच प्रचारासाठी पुण्यात मोठा अवधी असल्याने उमेदवारांकडून संघटनात्मक बांधणीवर भर देत कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या जात असून, प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले जात आहे.
यामध्ये माजी नगरसेवकांना स्वत: दररोज ठराविक घरांना भेटी देण्यासह महिला, तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्यापर्यंत उमेदवाराचे नाव आणि पक्षाचे चिन्ह पोहोचविण्याचे नियोजन देण्यात आले आहे. हे काम व्यवस्थित सुरू आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांचा जाहीर प्रचार नसला, तरी सूक्ष्म प्रचाराने चांगलाच वेग घेतल्याचे दिसून येत आहे.
अर्जानंतरच जाहीर प्रचार
लोकसभेसाठी नावे जाहीर झालेल्या उमेदवारांकडून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेनंतरच जाहीर प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे. राज्यात पाच टप्प्यांत निवडणूका असून, पुण्यात चौथ्या टप्पात १३ मे रोजी मतदान होणार आहे, तर निवडणुकीची प्रक्रिया १८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आताच् जाहीर प्रचार केल्यास खर्च, तसेच वारंवार मतदारांपर्यंत पोहोचताना चांगलीच दमछाक होणार आहे.
त्यामुळे या कामासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयार करण्यासाठी सूक्ष्म नियोजन महत्त्वाचे ठरत आहे. त्यानुसार प्रत्येकाला उमेदवाराच्या आधी त्याचे नाव आणि चिन्ह घरोघरी पोहोचविण्याचे काम देण्यात आले असून, मतदारांची मोबाइल क्रमांकासह माहितीही संकलित केली जात आहे. त्यामुळे जाहीर प्रचाराच्या आधी हा सूक्ष्म प्रचार जोर धरत आहे.
प्रत्येक वयोगटासाठी स्वतंत्र यंत्रणा
राजकीय पक्षांकडून युवा मतदार, महिला मतदार, ज्येष्ठ नागरिकांसाठी, तसेच झोपडपट्टयांसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यासाठी पक्षाच्या आघाड्या स्थापन करण्यात आल्या असून, त्यांना मेळावे, तसेच छोटे छोटे गट करून बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सत्ताधाऱ्यांकडून शासनाच्या योजनांची माहिती दिली जात असून, विरोधकांकडून या योजना कशा फसव्या आहेत, याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली जात आहे.