Google Removes Apps : गुगलने काही भारतीय अॅप्सवर कारवाई केली आहे. भारतातील 10 कंपन्यांच्या ॲप्स गुगलने Play Store वरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व्हिस चार्ज पेमेंट वादानंतर गुगलने हे पाऊल उचलले आहे. कित्येक प्रस्थापित अॅप्सना प्ले-स्टोअरकडून भरपूर फायदा झाला आहे. मात्र त्यांनी सर्व्हिस फी दिलेली नसल्याचे गुगलने म्हटले आहे. यात मॅट्रिमॉनी, कुकू एफएम यासारख्या अनेक लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे.
हा वाद काही भारतीय स्टार्टअप्सच्या ॲप पेमेंटवर 11 ते 26 टक्के शुल्क आकारण्यापासून गुगलला रोखण्याच्या प्रयत्नाबाबत आहे. ही फी आधी 15 ते 30 टक्के एवढी होती. मात्र, CCI ने दिलेल्या आदेशांनंतर ही फी 11 ते 26 टक्के करण्यात आली होती. गुगलच्या प्लॅटफॉर्म फी बाबत कित्येक अॅप्सनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने कंपन्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर गुगलने ही कारवाई केली आहे.
भारतीय अॅप्सकडून नाराजी व्यक्त
गुगलच्या या कारवाईवर भारतीय अॅप्सनी नाराजी व्यक्त केली आहे. गुगलने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक अॅप्स हटवण्यास सुरुवात केली असल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे. भारत मॅट्रिमॉनीचे फाऊंडर मुरुगावेल जानकीरामन यांनी ‘हा भारतातील इंटरनेटसाठी काळा दिवस’ असल्याचं म्हटले आहे.
कुकू एफएमचे को-फाऊंडर विनोद कुमार मीना म्हणाले की, ‘गुगल एका मोनोपॉलीप्रमाणे काम करत आहे.’ ‘जीवनसाथी’च्या इन्फो एज कंपनीचे संस्थापक संजीव बिकाचंदानी म्हणाले, की त्यांनी वेळेवर गुगलला सगळी फी भरली असूनही ही कारवाई करण्यात आली. तर, क्वॅकक्वॅक अॅपचे फाऊंडर रवी मित्तल यांनी सांगितलं, की कंपनी गुगलने दिलेल्या नियमांचे पालन करेल.
स्टेज ॲप्सचे सीईओ आणि सह-संस्थापक विनय सिंघल यांनी एक पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत त्यांनी लिहिले, “आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडियाला इतके मोठे यश मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न करतात, जर गुगलसारख्या डिजिटल ईस्ट इंडिया कंपन्यांनी भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम अशा प्रकारे नष्ट केली तर काय होईल?”, असा सवाल केला आहे.
या ॲप्सवर केली कारवाई ?
गुगलने कारवाई केलेल्या अॅप्समध्ये Matrimony.com, Bharat Matrimony, Shaadi.com, Jeevansathi या मॅट्रिमॉनियल अॅप्सचा समावेश आहे. ALTT हे ओटीटी अॅप, Kuku FM हे ऑडिओ अॅप आणि Quack, Truly Madly या डेटिंग अॅप्सचा देखील यात समावेश आहे.