पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी (1 मे)शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत सकाळी सहा ते दुपारी तीन यावेळेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. शहराच्या मध्यभागात मोदी यांचे विविध कार्यक्रम आहे मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून मध्यभागात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दरम्यान आज बंदोबस्ताच्या रिहर्सलमुळे झालेली वाहतूक कोंडी लक्षात घेत नागरिकांनी महत्वाचे काम असल्याशिवाय शहराच्या मध्यवर्ती भागात प्रवेश टाळणे योग्य होईल. दौ-यादरम्यान पुणे शहरातील शाळा, महाविद्यालये, सर्व आस्थापना, दुकाने, कार्यालये, शासकीय कार्यालये, कंपन्या इ. यांचे कामकाज सुरळीत चालू राहणार असल्याचे पोलिसांनी कळवले आहे.
पंतप्रधान मोदी यांचे आगमन मंगळवारी सकाळी शहरात होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोदी दर्शन घेणार आहेत. त्यानंतर स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम निमंत्रितासाठी आहे. शिवाजीनगर येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित कार्यक्रमात मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मध्यभागातील वाहतूक बदल करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी सहा ते दुपारी तीन यावेळेत वाहतूक बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
– हे रस्ते टाळा –
मंगळवारी सकाळी सहा ते दुपारी तीन यावेळेत प्रमुख मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. वाहतूक बदल करण्यात आलेले रस्ते पुढीलप्रमाणे- आचार्य आनंदऋषीजी चौक (पुणे विद्यापीठ चौक), वेधशाळा चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, शिवाजी रस्ता, बुधवार चौक, सेवासदन चौक, टिळक चौक (अलका चित्रपटगृह), टिळक रस्ता, जेधे चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, संगमवाडी रस्ता, येरवडा सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रस्ता.
सोशल मिडियातील अफवांवर विश्वास नको – उपायुक्त मगर
रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे 9 तास थांबविली जाणार असलेबाबत काही सोशलमिडीयाव्दारे पसरवून विनाकारण नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. तरी नागरिकांनी सोशल मिडीयावर प्रसारीत होणा-या मेसेजकडे लक्ष देवू नये. पुण्यातील नुकत्याच घडून गेलेल्या घटनांची पार्श्वभूमी व सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी घेण्यात येईलच परंतू त्याचा ताण वाहतूक व्यवस्थेवर होणार नाही याची दक्षता घेत आहोत.
व्ही.व्ही.आय.पी. यांच्या वाहनांचा ताफा ज्या रस्त्यावरुन मार्गस्थ होणार असेल त्यामार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव आवश्यकतेप्रमाणेच टप्प्या-टप्प्याने कमी कालावधीकरीता वाहतूक नियमन करण्यात येईल. यातील कोणताही रस्ता सलगप्रमाणे मोठया कालावधीकरीता बंद करण्यात येणार नाही, तर फार थोड्या कालावधीकरीता वाहतूक थांबविण्यात येईल. इतर वेळी मात्र वाहतूक पूर्ववत असणार आहे.
कार्यक्रमासाठी निमंत्रीत नागरिकांसाठी वेळेत पोहचण्याकरीता निमंत्रीतांचे वाहनांना कोणताही अडथळा होणार नाही याची वाहतूक पोलीस दक्षता घेणार आहेत, याबाबत सर्व अधिकारी व अंमलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. व्ही. व्ही. आय.पी. यांचे पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाकरीता असलेल्या दौ-यादरम्यान पुणे शहरातील शाळा, महाविद्यालये, सर्व आस्थापना, दुकाने, कार्यालये, शासकीय कार्यालये, कंपन्या इ. यांचे कामकाज सुरळीत चालू राहणार आहे. तरी वाहतूक बदलाबाबत कोणत्याही अफवांवर किंवा बातम्यांवर विश्वास ठेवू नये व जास्तीत जास्त पर्यायी मार्गाचा वापर करुन वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.