PM Narendra Modi – आपल्या दोन दिवसांच्या केरळ भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला आहे. कार्यकर्त्यांनी केवळ बूथवर फोकस ठेवावा जेणेकरून केरळमध्ये भाजपला विजय मिळू शकेल. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भाजप कार्यकर्त्यांना पक्षाची लाइफलाइन अर्थात जीवनरेषा असे संबोधले.
केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील घराघरांत पोहोचवावी. तुमच्या क्षमतेवर मला विश्वास आहे. तुमची मागची कामगिरी पाहिल्यानंतर मला विश्वास वाटतो आहे की, तुम्ही केरळमधील लोकांची मने जिंकू शकता असेही मोदी म्हणाले.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर मोदी सातत्याने मंदिरांना भेटी देत पूजा करत आहेत. केरळमध्येही त्यांनी कोच्ची येथे झालेल्या पक्ष प्रभारींच्या संमेलनात कार्यकर्त्यांना मंदिरांची साफसफाई करण्याचे आवाहन केले.
२२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा जरी अयोध्येत होत असली तरी श्रीराम ज्योती देशातील प्रत्येक मंदिरात आणि घराघरात पेटत राहील. अयोध्येतील सोहळा हा देशातील करोडो लोकांच्या आस्थेचा आणि भक्तीचा क्षण आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच्या सर्व नियमांचे मीही पालन करतो आहे.
गेल्या काही दिवसांत अनेक मंदिरांत दर्शनाची आणि तेथे स्वच्छता करण्याची संधी मला मिळाली. आपणही सगळ्यांनी मंदिरांमध्ये सफाई अभियान राबवावे अशी माझी सगळ्यांना विनंती राहील असे त्यांनी नमूद केले.