वाल्हेकरवाडी दवाखान्याची इमारत धोकादायक ः स्ट्रक्चरल ऑडिट होऊनही दुरुस्ती नाही
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाल्हेकरवाडी दवाखान्याची इमारत धोकादायक बनली आहे. त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर इमारत तात्काळ जमीनदोस्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, साडेतीन वर्ष उलटूनही त्याच धोकादायक इमारतीत दवाखान्याचा बाह्यरुग्ण विभाग सुरु असून त्याकडे स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महापालिकेचा स्थापत्य विभाग रुग्णांच्या जिवाशी खेळ करत असल्याचे समोर आले आहे.
चिंचवड येथील वाल्हेकरवाडी दवाखान्यामध्ये बाह्यरुग्ण विभाग आहे. परिसरातील रुग्णांची येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. येथील रुग्णालयामध्ये प्रथमोचरासह, डेग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू या आजारांची तपासणी केली जाते.
तसेच दवाखान्यातील कर्मचारी राष्ट्रीय लसीकरण अंतर्गत लसीकरणाचे काम करतात. दवाखान्यामध्ये दररोज सुमारे शंभर रुग्ण तपासणीसाठी येतात. या दवाखान्यामुळे रुग्णांची सोय झाली आहे. मात्र इमारत जुनी झाल्याने ती धोकादायक बनली आहे. इमारतीच्या भिंतीना तडे गेले आहेत. तसेच स्लॅबमधून पावसाचे पाणी दवाखान्यामध्ये झिरपते. अनेक ठिकठिकाणी भितीचे पापुद्रे निघाले आहेत. त्यामुळे इमारतीची रया गेली आहे.
महापालिकेच्या स्थापत्य विभागाने 2016 मध्ये त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यामध्ये ही इमारत जीर्ण झालेली असून ती तात्काळ पाडण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. मात्र स्ट्रक्चरल ऑडीटचा अहवाल सादर केल्यानंतर स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
ही इमारत धोकादायक असतानाही स्थापत्य विभागाने ती इमारत पाडली नाही. स्ट्रक्चरल ऑडिट होऊन साडेतीन वर्ष उलटूनही याकडे दुर्लक्ष केले आहे. जीर्ण इमारतीचा भाग कोसळून जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
या इमारतीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने याकडे गांभार्याने बघायला हवे होते. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने येथील दवाखाना त्वरित दुसरीकडे हलवून जीर्ण झालेली इमारत जमिनदोस्त करावी. तसेच या ठिकाणी दवाखान्यासाठी त्वरित नवीन इमारत बांधण्यात यावी.
– माधुरी कुलकर्णी, स्थानिक नगरसेविका.
तात्पुरता दवाखाना चालविण्यासाठी जागा मिळत नाही. तेथील दवाखाना स्थलांतरित केल्याशिवाय तेथील इमारत पाडू शकत नाही. त्या इमारतीचे पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या विचारात
प्रशासन आहे.
– प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता