पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गायन, वादन, नृत्याविष्कार यांद्वारे १० व्या गानसरस्वती महोत्सवात सुप्रसिद्ध कलाकारांनी गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांना आदरांजली अर्पण केली.
ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. या महोत्सवाला नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र बिभास आमोणकर, निहार आमोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अभय नायमपल्ली (कर्नाटकी गिटारवादन), मानस कुमार (व्हायोलिनवादन) आणि ईशान घोष (तबलावादन) यांनी केली. यानंतर पतियाला घराण्याच्या गायिका विदुषी कौशिकी चक्रबर्ती यांचे गायन झाले. ज्येष्ठ बासरीवादक पं रोणू मजुमदार यांनी राग अभोगी सादर करत दिवसाचा समारोप केला.
गायक सौरभ काडगांवकर यांनी राग भीमपलास सादर करत दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली. यानंतर आरती अंकलीकर टिकेकर यांनी राग पूर्वा कल्याण प्रस्तूत केला. यानंतर नीलाद्री कुमार यांचे सतार वादन झाले.
व्हायोलिन वादन आणि गायन यांनी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्राला सुरुवात झाली. यामध्ये युवा आश्वासक कलाकार जशन भूमकर यांनी सादरीकरण केले. यानंतर पं. मिलिंद आणि यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन सहवादन झाले.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्राचा समारोप पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनाने झाला. संतूरवर छेडलेले राग हंसध्वनीचे सूर आणि कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांच्या मनोहर कथकनृत्य प्रस्तुतीने महोत्सवाच्या चौथ्या सत्राला सुरुवात झाली. डॉ शंतनू यांनी राग हंसध्वनी सादर केला. यानंतर पं. विश्वमोहन भट्ट यांनी मोहनवीणा आणि सुपुत्र पं सलील भट्ट यांनी सात्विकवीणेवर सहवादन केले. पं. रघुनंदन पणशीकर यांच्या घराणेदार गायकीने महोत्सवाचा समारोप झाला.