कल्याण-नगर महामार्गावर पॅचवर्क
बेल्हे – कल्याण-नगर महामार्ग खड्ड्यांत या मथळ्याखाली दैनिक प्रभातने गुरुवारी (दि. 28) वृत्त प्रसिद्ध होताच झोपलेले महामार्ग प्रशासन खडबडून जागे झाले अन् शुक्रवारी (दि. 29) तात्काळ पॅचवर्क करून खड्डे बुजवल्याने प्रवाशांसह स्थानिकांनी प्रभातचे आभार मानले आहेत.
आळेफाटा ते अणे घाटापर्यंत कल्याण-नगर महामार्गाला अनेक धोकादायक खड्डे अपघाताला आमंत्रण देत असून ते तात्काळ बुजवावेत अशी ग्रामस्थांनी मागणी केली होती. रस्त्याला मधोमध खड्डे असल्यामुळे वाहनचालकांना रात्री अपरात्री या खड्ड्यांचा धोका निर्माण झाला होता.
तसेच खड्डा चुकवण्याच्या नादात अपघात घडण्याची शक्यता होती. तसेच अणे घाट हा तीव्र उताराचा आणि नागमोड्या वळणांचा असल्यामुळे वाहनचालकाला खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता.
वाहन भरधाव वेगात असताना अचानक खड्डा चुकवताना किंवा ब्रेक दाबला तरी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता होती. महामार्ग प्रशासनाने मार्गावरील सर्व धोकादायक खड्डे तात्काळ बुजवल्याने राजुरी, बेल्हे ग्रामस्थांनी दैनिक प्रभातचे आभार मानले आहेत.