नवी दिल्ली: दिल्लीतील करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा बॅंक उभारली जाणार आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज जाहीर केले. ही प्लाझ्मा बॅंक आगामी दोन दिवसातच कार्यरत होईल, असेही केजरीवाल यांनी सांगितले. पत्रकारांबरोबर ऑनलाईन वार्तालाप करताना त्यांनी या प्लाझ्मा बॅंकेची माहिती दिली.
दिल्ली सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या इन्स्टिट्युट ऑफ लीव्हर ऍन्ड बिलायरी सायन्सेसमध्ये ही प्लाझ्मा बॅंक उभारली जाणार आहे. कोविड-19 बाधित रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्माची आवश्यकता भासल्यास डॉक्टर अथवा हॉस्पिटलांनी या प्लाझ्मा बॅंकेशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. करोनातून बाधामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावे यासाठी “आप’ सरकार प्रोत्साहन देईल.
प्लाझ्मादानासंदर्भातील चौकशीसाठी एक हेल्पलाईन क्रमांकही लवकरच सुरू करण्यात येईल. तसेच प्लाझ्मा दान करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी वाहतुकीची व्यवस्था सरकारच्यावतीने केली जाईल, असेही केजरीवाल यांनी सांगितले.
कोविड-19 च्या उपचारासाठी प्रथमच अशाप्रकारची प्लाझ्मा बॅंक उभारली जाणार आहे. प्रत्यक्ष्यात ही देशातील पहिली प्लाझ्मा बॅंक असणार आहे. देशातील नागरिकांना प्लाझ्माची नितांत आवश्यकता असतानाच अशी प्लाझ्मा बॅंक उभारली जाणार आहे. या प्लाझ्मा बॅंकेतून खासगी आणि सरकारी रुग्णालयांनाही प्लाझ्मा उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
प्लाझ्मा थेरपी म्हणजे संजीवनी नव्हे…
प्लाझ्मा थेरपी उपचारासाठी योग्य ठरत असली, तरी ही उपचार पद्धती म्हणजे संजीवनी आही. अखेरच्या टप्प्यात व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना वाचवणे खूप अवघड असते. ही उपचार पद्धती त्यांच्यासाठी उपयोगी ठरू शकते, असे केजरीवाल यांनी सांगितले.
आपल्य सरकारने प्लाझ्मा थेरपीचा उपयोग कोविड-19 बाधित 29 रुग्णांवर केला असून त्याचे परिणाम उत्साहवर्धक आहेत. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंदर जैन यांनाही कोविड-19 उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपी दिली गेली होती. जैन यांची प्रकृती आता सुधारत आहे, असेही केजरीवाल म्हणाले.