वडगाव हवेली -लग्न म्हणजे माणसाच्या आयुष्यातील एक आनंदाचा अनमोल क्षण. आजच्या बदलत्या काळात लोकांकडे मुबलक सोयीसुविधा असल्याने विवाहाचे स्वरूप बदलत आहे. लग्नात हौसेला मोल नाही म्हणत लाखो रुपये खर्च केले जात आहेत. पण हौसमौस बाजूला ठेवून येथील दोन युवकांनी लग्नातील अवास्तव खर्चाला फाटा देत शंभर झाडांचे रोपण करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
वडगाव हवेली येथील निसर्ग मित्र प्रविण जगताप यांचा विवाह विजया थोरात रा. कार्वे यांच्यासोबत तर सुरज रामचंद्र जगताप यांचा विवाह कल्याणी इतापे रा. देगाव यांच्याशी संपन्न झाला. हे चौघेही उच्चविद्याविभूषीत असून सर्वाना निसर्ग संवर्धनाची आवड आहे.
सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन असल्यामुळे साधेपणाने विवाह सोहळे पार पडत आहेत. त्यामुळे या आनंदाच्याप्रसंगी झाडे लावून हा दिवस संस्मरणीय करण्याचे या चौघांनी ठरवले. त्यांनी स्वखर्चातून 100 झाडे भेट देऊन तरुणांपुढे वृक्षारोपणाचा एक नवीन आदर्श ठेवला आहे.
नोकरी व व्यवसाया निमित्त पुणे स्थित असलेल्या युवकांच्या कल्पनेतून साकारलेल्या निसर्गराजा मित्र जिवांचे या सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी एकत्र येऊन आजपर्यंत अनेक ठिकाणी पर्यावरण संवर्धनाचे कार्यक्रम राबिविले आहेत. यामध्ये या संस्थेने वडगांव हवेली या ठिकाणी गेली दोन वर्षामध्ये जवळपास दिड हजार वृक्षाची लागवड करून त्याचे संगोपन केले आहे. प्रविण जगताप हा गेल्या 4 वर्षा पासून निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेच्या माध्यमातून हिवरे तालुका पुरंदर तसेच लीला रोपवाटिका येथे श्रमादनासठी हिरीरीने सहभागी होत असतो.
त्यामुळे आपल्या विवाहाचा आनंद वृक्षारोपण करून साजरा करायचा त्याचा अगोरदरच मनोदय होता. त्याला त्याची पत्नी विजया यांचीही साथ मिळाली. तसेच सुरज जगताप व कल्याणी या जोडप्याने वृक्षारोपण करून आपला आनंद द्विगुणित केला.
आनंदाच्याप्रसंगी वृक्षारोपण करून त्याची देखभाल करण्याची वडगावकरांची ही प्रथा गेल्या 3 ते 4 वर्षांपासून चालूच आहे. हीच प्रथा इतर गावातही सुरू झाली तर लवकरच प्रत्येक गावात पूर्वीसारख्या देवराया दिसायला लागतील.