पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, दोन अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये क्रिकेट वर्ल्डकपचा चांगलाच फिव्हर चढला आहे. गुरूवारी (दि.19) महापालिका वाऱ्यावर सोडून आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी गहुंजे स्टेडियमवर विश्व चषक क्रिकेटचा सामना पहायला गेले होते. आयुक्तच दुपारपासून गायब झाल्याने पालिकेत शुकशुकाट पहायला मिळाला.
क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये गुरूवारी भारत आणि बांगलादेश या दोन संघामध्ये क्रिकेट मॅच झाली. पुण्यात विश्वचषकातील पहिलाच सामना असल्यामुळे तिकिट खरेदीसाठी चाहत्यांची मोठी झुंबड उडाली होती. त्यातच तिकिटाचा काळा बाजार झाल्याबाबत काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना या सामन्याची व्हीआयपी तिकिटे मिळाली होती. तर काही अधिकाऱ्यांना पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिकिटे दिल्याची चर्चा आहे. महापालिकेतील नगरसेवकांचा 13 मार्च 2022 ला पाच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. आयुक्त सिंह हेच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत.
आयुक्तांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. कामकाजाच्या दिवशीच आयुक्त सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, उपायुक्त रविकिरण घोडके यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी पालिका वाऱ्यावर सोडून क्रिकेट सामना पाहण्यास गेले होते. त्यामुळे मॅच पाहण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांची महापालिकेमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.
मी रितसर रजा घेऊन मॅच बघायला गेलो…
मॅच बघायला गेल्याबाबत एका उपायुक्ताला संपर्क साधला असता ते काहीसे गोंधळले. त्यानंतर मी रितसर अर्ध्या दिवसाची रजा घेऊन मॅच पहायला आलो असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र,सामना पहायला गेलेल्या एकाही अधिकाऱ्याचा सायंकाळी पाच वाजेपर्यंत रजेचा अर्ज आला नसल्याचे प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी “दै. प्रभात”ला सांगितले.