- प्रशासन, भांडार, आकाशचिन्हचे अधिकारी बदलले जाणार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांचे सहायक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे वारे सध्या महापालिकेत वाहू लागले आहे. महत्त्वाच्या असलेल्या प्रशासन, करसंकलन, मध्यवर्ती भांडारासह आकशाचिन्ह विभागाचे तसेच काही प्रभाग कार्यालयांचे सहायक आयुक्त बदलाचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत या बदल्या होणार असल्याने “अर्थपूर्ण’ पदांवर आपलीच वर्णी लागावी यासाठी सहायक आयुक्तांचे “लॉबिंग’ जोरात सुरू असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांसह प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालयांचे प्रमुख म्हणून सहायक आयुक्त कार्यरत आहेत. महापालिकेत सध्या दहा सहायक आयुक्त आणि आठ उपायुक्तांची पदे आहेत. यापैकी दहाही सहायक आयुक्त कार्यरत असून उपायुक्तांची मात्र काही पदे रिक्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सहायक आयुक्तांच्या बदल्या झालेल्या नाहीत. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना हटविण्यासाठी सत्ताधारी भाजपातील काही पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला होता. त्यांच्या आग्रहाला आयुक्तांनी होकार दिला असून, बदल्या करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.
सहायक आयुक्तांच्या बदल्यांबाबत आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांशी बोलून काही नावे अंतिम केली आहेत. काही नावांवर येत्या दोन-चार दिवसांत शिक्कामोर्तब होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनोज लोणकर यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभागाचा पदभार सोपविण्यात येणार असून, मध्यवर्ती भांडार विभागाचे मंगेश चितळे यांच्याकडे करसंकलनचा पदभार देण्यात येणार आहे. तर प्रशासन विभागाची जबाबदारी उद्यान विभागाचे उपायुक्त सतीश इंगळे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. करसंकलनच्या स्मिता झगडे यांच्याकडे महिला व बालकल्याण विभाग देण्यात येणार असून त्यांच्याकडील क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार कायम राहणार आहे.
निवडणूक विभागाचा सध्या अण्णा बोदडे यांच्याकडे पदभार असून, तो बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे सोपविण्याचे निश्चित असून बोदडे यांच्याकडे माहिती जनसंपर्क आणि “क’ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार कायम राहणार आहे. “अ’ क्षेत्रीय कार्यालयाचे चंद्रकांत इंदलकर यांच्याकडून क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार काढण्यात येणार असून, त्यांना आकाशचिन्ह व परवाना विभाग देण्यात येणार आहे. त्यांच्याकडील कायदा आणि कामगार कल्याण हे विभाग कायम राहणार आहेत. याशिवाय सुनील आलमेलकर, प्रशांत जोशी, संदीप खोत यांच्याकडीलही जबाबदारीची खांदेपालट करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
परिमंडलाची होणार निर्मिती
महापालिकेच्या कामकाजामध्ये आणखी सुटसुटीतपणा आणण्यासाठी पालिका स्तरावर परिमंडलाची निर्मिती करण्याबाबतही विचारविनिमय सुरू करण्यात आला आहे. नव्याने परिमंडलाची निर्मिती करून सध्या कार्यरत असलेल्या सहायक आणि उपायुक्तांवर ही जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त संदीप खोत यांच्यावर परिमंडलाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचीही चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.