शिक्रापूर, (वार्ताहर) – सणसवाडी (ता. शिरूर) येथील काळूबाई नगर येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास हॉटेलला आग लागून हॉटेलसह शेजारील बेकरी जळून खाक झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
काळूबाई नगर येथे आनंत डापकर यांचे दौलत हॉटेल असून 29 एप्रिल रोजी डापकर हे हॉटेल बंद करुन घरी गेले होते. मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास डापकर यांच्या दौलत हॉटेलमधून धूर येत असल्याचे शेजारील नागरिकांना दिसले. माहिती मिळताच शिक्रापूरचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, हवालदार आत्माराम तळोले, हॉटेल चालक आनंत डापकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली;
मात्र यावेळी हॉटेल शेजारील डायमंड बेकरीला आगीने वेढा घातला, यावेळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांसह पुणे महानगर प्राधिकरण विकास महामंडळ वाघोली येथील अग्निशामक दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणले; परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्याने हॉटेलमधील टेबल, खुर्च्या, फ्रीज, भांडी, किराणा सामान, भाजीपाल्यासह शेजारी बेकरीमधील सर्व साहित्य जळून खाक झाले.
यावेळी लागलेल्या आगीत आनंत डापकर यांच्या दौलत हॉटेलसह शेजारील फुरकान अन्सारी यांच्या डायमंड बेकरीचे तब्बल आठ लाखांचे नुकसान झाले. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.