जळगाव- चुलीवरील उकळत्या दुधात पडून एका अडीच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील पिंप्री खुर्द तालुका धरणगाव येथे घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रोहन सुभाष धोबी असे मृत बालकाचे नाव आहे. रोहनचे आजोबा एका दुध डेअरीवर कामाला आहेत. त्यामुळे रोहनच्या घरी तीन लिटर दुध रोज येते. दरम्यान 13 ऑक्टोबर रोजी सकाळच्या वेळेत अंगणातील चुलीवर दुध तापवण्यासाठी ठेवले होते. यावेळी रोहन त्याच्या बहिणीसोबत खेळत होता. खेळता खेळता रोहन हा चुलीजवळ गेला त्यानंतर तो उकळत्या दुधात पडला.
रोहन उकळत्या दुधात पडल्याचे त्याच्या घरच्यांच्या लक्षात येताच सर्वांनी चुलीकडे धाव घेतली व त्यास तात्काळ जळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी दाखल केले. रोहन 36 टक्के भाजला होता. येथील डॉक्टरांनी रोहनवर प्राथमिक उपचार करत त्याला मुंबईला हलविण्यास सांगितले त्यानंतर पुढिल आठ ते दहा दिवस त्याच्यावर मुंबईतर उपचार करण्यात आले मात्र उपचारादरम्यान रोहनने मृत्यूला कवटाळले.