- 9 ऑक्टोबर निवडणूक ः उरला केवळ सव्वा वर्षांचा कालावधी
पिंपरी – महापालिकेच्या आठ प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी 9 तारखेला निवडणूक होणार आहे. तर, सोमवारी (दि. 5) अर्ज भरण्यासाठी मुदत असल्याने त्या दिवशीच उमेदवार निश्चित होईल. महापालिका निवडणुकांसाठी सव्वा वर्षांहून अधिक कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे निवडणुकांपूर्वी लाभाचे पद पदरात पाडून घेण्यासाठी सत्ताधारी भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच रंगणार आहे.
महापालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी 30 सप्टेंबरपासून अर्ज वाटपास सुरुवात झाली. 5 तारखेला दुपारी 3 ते 5 या वेळेत इच्छुक उमेदवारांचे अर्ज त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयात स्विकारले जाणार आहेत. 9 तारखेला सकाळी 11:30 पासून दुपारी 4 वाजेपर्यंत प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी निवडणूक चालणार आहेत. महापालिका प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात ही निवडणूक होईल.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2017 मध्ये झाल्या. नगरसेवकांचा पाच वर्षांचा कालावधी 2022 मध्ये संपत आहे. 2022 मध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात निवडणुका होतील. त्यामुळे त्यासाठी आता जवळपास 1 वर्ष आणि 4 महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. येत्या मंगळवारी (दि. 6) विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, कला-क्रीडा-साहित्य व सांस्कृतिक समिती तसेच, शिक्षण समिती आदी समित्यांसाठी सदस्य पदावर प्रत्येकी 9 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. एकूण 45 नगरसेवकांना त्यासाठी संधी मिळेल. समिती सदस्यांची निवड झाल्यानंतर अध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल.
अध्यक्ष पदासाठी खरी चुरस
समित्यांच्या अध्यक्ष पदासाठी खरी चुरस असणार आहे. मात्र, तत्पूर्वीच प्रभाग समिती अध्यक्ष निवडले जाणार असल्याने ज्यांना समित्यांवर संधी मिळण्याची शाश्वती नाही त्या नगरसेवकांनी किमान प्रभाग समिती अध्यक्ष पद मिळावे, यासाठी रस्सीखेच सुरू केली आहे.
प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांची नावे सोमवारी (दि. 5) निश्चित होतील. पक्षश्रेष्ठींकडून ही नावे कळविण्यात येतील. त्यानुसार उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितले जाईल.
– नामदेव ढाके, सत्तारुढ पक्षनेते.