पिंपरी- आळंदी-पुणे पालखी महामार्गावर वडमुखवाडी येथे पिंपरी-चिंचवड महापालिका संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज भेटीचे समूहशिल्प साकारत आहे. गेली सात वर्षांपासून हे काम सुरू आहे. या समुहशिल्पातील शेवटची संत नामदेव महाराजांची 21 फूट उंचीची ब्रांझ धातुची मूर्ती बसविण्यात आली आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त अनुक्रमे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे शहरातून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आळंदी-पुणे मार्गाने, तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने जात असतो.
या मार्गावर निगडी येथे संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीवर आधारित भक्ती-शक्ती शिल्पसमूह महापालिकेने उभारले आहे. याच धर्तीवर आळंदी-पुणे पालखी मार्गावर वडमुखवाडी येथील पादुका मंदिर परिसरालगत संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित शिल्पसमूह उभारण्याचे काम सात वर्षांपासून सुरू होते. करोनाच्या काळात दोन वर्षे हे काम पूर्णत: ठप्प होते.
माऊलींचा पालखी सोहळा आषाढीवारीला वडमुखवाडी येथील पादुका मंदिरात थांबतो. या मंदिरालगतच्या विस्तीर्ण दोन एकर जागेवर महापालिका संत भेटीचे समूह शिल्प साकारण्यात आले आहे. या समूहशिल्पात 25मूर्तींचा समावेश असून, सर्वात उंच असलेली संत नामदेव महाराजांची मूर्ती नुकतीच या शिल्पात बसविण्यात आली आहे. या शिल्पातील प्रत्येक मूर्तीचे वजन व उंचीची पडताळणी राज्य सरकारच्या कला संचालनालयाने केली आहे. सुरुवातीला समूह शिल्पासाठी महापालिकेने सव्वा कोटी रुपयांची तरतूद केली होती. दरम्यानच्या काळात कला संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून काही बदल सुचविले. दूर अंतरावरून मूर्ती दिसाव्यात, यासाठी सहा मूर्तींची उंची 22 फुटांपर्यंत वाढविली आहे.
संतसृष्टीमुळे शहराला नवी ओळख
एकूण दोन एकर जागेपैकी साठ गुंठे जागा समूहशिल्पासाठी उपलब्ध आहे. त्यावर शिल्प साकारले जात आहेत. मूर्तींबरोबरच ऍम्फी थिएटर व गार्डनही साकारण्यात येत आहे. हे काम अपूर्ण आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना वारीसोबत चालताना भक्तीभावाचे वातावरण तयार व्हावे, हा समूहशिल्पाचा उद्देश आहे. या शिल्पामुळे शहराची नवीन ओळख तयार होण्यास हातभार लागत आहे.