ओतूर – नगर-पुणे जिल्ह्याला जोडणारा नजिकचा असणारा खामुंडी मार्गावरून पुढे अवघड बदगीच्या घाटात जांभळे येथे स्कॉर्पिओ (एमएच 16 बीएच 6020) कोसळून भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला. वाहन मालक नवनाथ हुलवळे (वय 40) यांचा जागीच तर तर राहुल हुलवळे (वय 40, दोघेही रा. जांभळे, ता. अकोले) यांना आळेफाटा येथे उपचारास नेताना वाटेत मृत्यू झाला.
ही घटना रविवारी (दि. 13) सायंकाळी सातला घडली. घाटाचा मार्ग अरुंद असून येथे वळणावर चढण रस्ता आहे. येथे कोसळल्याचे दृश्य येथील भरत डुंबरे आणि इतर सहकारी यांनी बघितले. सामाजिक कार्यकर्ते विकास चव्हाण यांनी ओतूर पोलिसांशी संपर्क केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले. बदगी आणि खामुंडी येथील ग्रामस्थांनी अडीच तास शर्थीचे प्रयत्न करून शोधकार्य केले.
अखेर नवनाथ हुलवळे यांचा मृतदेह आढळला. जखमी हुलवळे यांस आळेफाटा येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले; परंतु त्यांचा मृत्यू झाला. खामुंडीचे सामाजिक कार्यकर्ते अनिल बोडके, शांताराम बोडके, कुणाल डुंबरे, बाळासाहेब शिंगोटे, अक्षय शिंगोटे, कैलास बोडके आणि शंभर लोकांनी प्रयत्न केले. ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे तपास करीत आहेत.