पुणे – महापालिकेत सोमवारपासून “प्रशासकराज’ असणार असून, नगरसेवकांचा कार्यकाळ पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. यापुढे ते नगरसेवक राहणार नसून, ते सर्वसामान्य नागरिकच असतील.
निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत; मात्र काही महापालिकांच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे तेथे प्रशासक नेमण्यासंदर्भात तीन फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने पत्र पाठवले होते. महापालिका आयुक्तांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे.
“मिनी महापालिका’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांकडे कामाचे विभाजन केले जाऊ शकते. स्थानिक पातळीवरच्या समस्या ज्या नगरसेवकांकडे यायच्या त्या आता प्रशासनाला पहाव्या लागणार आहेत. अर्थात ते आधीही प्रशासनच करत होते मात्र त्यामध्ये नगरसेवक हा दुवा होता. मात्र सर्वसामान्य नागरिक म्हणून थेट प्रशासनाकडे समस्या मांडता येणार आहेत. मात्र, निविदा वगैरे विषयात आता नगरसेवकांचा कोणताही संबंध राहणार नाही.
कार्यकारिणी बरखास्त
महापालिकेच्या सर्व कार्यकारिणी रविवारी बरखास्त झाल्या. त्यामुळे सोमवारपासून प्रशासक म्हणून आयुक्त सर्व निर्णय घेतील. यामध्ये महापौरांपासून ते सर्व नगरसेवक त्यांच्या पदावरून पायउतार होतील. नगरसेवक किंवा पदाधिकारी म्हणून त्यांना असलेल्या सर्व सोयी-सुविधाही संपुष्टात येणार असून, त्यामध्ये कार्यालय, गाडी, सेवक या गोष्टींचा समावेश आहे. दरम्यान, पालिकेत प्रशासकराज आल्याबद्दल कॉंग्रेसतर्फे सोमवारी आनंदोत्सव करण्यात येणार आहे.