पिंपरी – खेळाडूसाठी वय खूप महत्त्वाचे असते, पर्यायाने एक-एक दिवस खूप महत्त्वाचा असतो. शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या खेळ प्रकारातील खेळाडू तयार झाले आहेत. ऍथलेटिक्स खेळांचा सराव करणाऱ्या खेळाडूंची संख्याही मोठी आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंची संख्याच दोनशेहून अधिक आहे.
या खेळाडूंना सध्या महापालिकेच्या ढसाळ नियोजनाचा फटका बसत आहे. एकीकडे शहराला स्पोर्टस हब बनविण्याचे दावे केले जातात आणि दुसरीकडे आठ महिने उलटले तरी एक सिंथेटिक ट्रॅक बदलता येत नाही, अशी परिस्थिती दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी-इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडासंकुलात सिंथेटिक ट्रॅक (कृत्रिम धावमार्ग) बदलण्याचे काम संथ गतीने सुरू आहे.
त्यामुळे शहरातील ऍथलेटिक्स खेळाचा सराव करणाऱ्या खेळाडूंची मोठी गैरसोय होत आहे. फेब्रुवारी महिन्यात ट्रॅक बदलण्याचे काम सुरू करण्यात आले, तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. संपूर्ण उन्हाळा उलटून गेल्यानंतर आता पावसाळ्याची कारणे पुढे केली जात आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील ऍथलेटिक्स खेळाचा सराव करणाऱ्या खेळाडूंना सरावासाठी शहरातील एकमेव सिंथेटिक मैदान आहे. याठिकाणी 15 वर्षांपूर्वी सिंथेटिक ट्रॅकचे काम करण्यात आले आहे. हा 400 मीटरचा आठ लेनचा सिंथेटिक ट्रॅक आहे. अनेक वर्षांपासून ट्रॅकवर खेळाडूंचा नियमित सराव आणि विविध स्पर्धामुळे तसेच बाहेरील वातावरणामुळे जुना ट्रॅक खराब झाला आहे.
वर्षभरापूर्वी जुना सिंथेटिक ट्रॅक बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे चार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. क्रीडा स्थापत्य विभागाकडून सुरू असलेले हे काम कासव गतीने सुरू आहे. या कामामुळे खेळाडूंना मैदानात प्रवेश बंद केला आहे. त्यांना सराव करता येत नाही. क्रीडा संकुलातील ट्रॅकवर सकाळी आणि सायंकाळी या दोन सत्रांत अनेक खेळाडू मैदानी स्पर्धेचा सराव करत होते. सध्या शालेय स्पर्धेपासून ते विविध क्रीडा स्पर्धांच्या हंगामालाही प्रारंभ झाला आहे. खेळाडूंना सरावासाठी ट्रॅकच उपलब्ध नसल्याने त्यांना इतर ठिकाणी सराव करावा लागत आहे.
सिंथेटिक ट्रॅकवर सराव करता न आल्याने त्याचा थेट परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होत आहे. शहरात 150 राज्यस्तरीय खेळाडू, तर 50 राष्ट्रीय खेळाडू आहेत. या खेळाडूंना पुण्यातील सिंथेटिक ट्रॅकवर सराव करावा लागतो. त्यामुळे खेळाडूंना आर्थिक झळ बसत आहे. नियमित सराव नसल्याने कामगिरी ढासळत असल्याचे खेळाडू सांगत आहेत.
पाऊस थांबण्याची पाहताहेत वाट
आवश्यक साहित्य आणल्यानंतरच खराब सिंथेटिक ट्रॅक काढण्याचे काम करायला हवे होते. मात्र तसे न करता थेट ट्रॅक काढून टाकण्याचे काम ठेकेदाराने केले. त्यामुळे पुन्हा ट्रॅकच्या कामाला विलंब झाला आहे. साहित्य नसल्याने नवा ट्रॅक टाकता येत नाही. वर्षभरापासून हे काम सुरू आहे. सर्व कामे झाली आहेत. केवळ धावपट्टी तसेच लॉन टेनिस कोर्ट व सिंथेटिक ट्रॅक अंथरण्याचे काम शिल्लक आहे. पावसाने उघडीप दिल्यावर महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेच्या क्रीडा स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले.
सिंथेटिक ट्रॅक तयार करण्याचे काम सुरू असल्याने तेथे ऍथलेटिक्सच्या खेळाडूंचा सराव बंद आहे. त्याबाबत क्रीडा विभागाकडे तक्रारी येत आहेत. काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत स्थापत्य क्रीडा विभागास तीन वेळा पत्र देण्यात आले आहे. – मिनीनाथ दंडवते, उपायुक्त, क्रीडा विभाग