पिंपरी – गेल्या काही वर्षांपासून तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन दिसून येत आहे. महापालिकेसह शासकीय यंणत्रा नागरिकांना घर बसल्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करताना दिसून येत आहे.
महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने नागरिकांसाठी कर भरण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देऊन करामध्ये सवलतही दिली आहे. या सुविधेचा शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे 2 लाख 59 हजार मालमत्ता धारकांनी तब्बल 376 कोटी 70 लाख 89 हजार रूपयांचा ऑनलाइन कराचा भरणा केला आहे. त्यामुळे शहरातील नागरिक दिवसेंदिवस “टेकनोसेव्ही” होत असल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमिनी अशा 6 लाख 7 हजार मिळकती आहेत. पहिल्या सहामाहीत 3 लाख 66 हजार 636 मालमत्ता धारकांनी 580 कोटी कराचा भरणा केला आहे. यामध्ये तब्बल 3 लाख 22 हजार 758 निवासी मालमत्ता, त्यानंतर 29 हजार 778 बिगर निवासी, 8 हजार 391 मिश्र, 2 हजार 787 औद्योगिक तर 2 हजार 875 मोकळ्या जमीन असणाऱ्या मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे.
मात्र, यामध्ये 2 लाख 59 हजार 24 मालमत्ता धारकांनी विविध ऍप आणि ऑनलाइन असा 376 कोटी 70 लाख 89 हजार रूपयांचा कर जमा केला आहे. त्यानंतर 63 हजार 305 जणांनी 74 कोटी 54 लाख रोख, 15 हजार 749 जणांनी 57 कोटी 43 लाख धनादेशाव्दारे, 433 जणांनी 26 कोटी 46 लाख आरटीजीएसव्दारे, 756 जणांनी एनईएफटीव्दारे 4 कोटी 54 लाख तर 435 जणांनी डीडीच्या माध्यमातून 3 कोटी 64 लाख रूपयांचा भरणा
केला आहे.
वाकड, सांगवी, चिंचवड, थेरगावमध्ये संख्या अधिक
कर संकलनासाठी शहरात 17 झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक 48हजार 575, सांगवीमध्ये 40 हजार 341, थेरगावमध्ये 33 हजार 838 तर चिंचवडमध्ये 33 हजार 715 मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये 5 हजार 140 मालमत्ता धारकांनी कर भरला आहे.