चिखली – देहू-आळंदी पालखी मार्गावरील तळवडे ते देहू फाटा (चऱ्होली) रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याचे काम प्रशासनाने अत्याधुनिक पद्धतीने करावे, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, देहू-आळंदी पालखी मार्गावरील तळवडे ते देहू फाटा (चऱ्होली) ही पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मार्गावर चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येणारे पाणी आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लाइनचे काम याच रस्त्यावर झाले आहे. या कामामुळे रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत.
तळेगाव, चाकण एमआयडीसीची रहदारी याच रस्त्यावर होत असून, तळवडे ते चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉरमधील सर्वाधिक लोकवस्ती या भागात आहे. सध्यःस्थितीत किमान 1 लाखाहून अधिक लोकसंख्येचा हा परिसर आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सर्वसामान्य वाहनचालक, नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तळवडे ते चऱ्होली भागातील वाढते नागरीकरण यामुळे पायाभूत सोयीसुविधा सक्षम करणे अत्यावशक आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
देहू-आळंदी पालखी मार्गावरील तळवडे ते देहू फाटा (चऱ्होली) रस्त्याच्या कामासाठी आगामी स्थायी समिती सभेत सल्लागार नियुक्तीला मंजुरी द्यावी. तसेच, निविदा प्रक्रिया राबवून अत्याधुनिक पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी आहे. तसेच, या रस्त्यावरील वाहतूक, पार्किग व्यवस्था, संबंधित जोड रस्ते या सर्व बाबींचा सविस्तर प्रकल्प अहवाल आगामी 15 दिवसांत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी सूचना केली आहे. यावर सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे. – महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा.