काळ्या काचा आता तरी हटणार का?

पोलीस महासंचालकाचे आदेश : ” त्या’ वाहनचालकांवर कारवाई करा

पिंपरी – चारचाकी गाड्यांच्या काचावर लावलेल्या काळ्याकुट्ट फिल्मवर बंदी आणून अनेक वर्षाचा काळ लोटला तरी अद्याप बहुतांश गाड्यावर काळ्या रंगाच्या फिल्म दिमाखात मिरवत असतात. कारच्या आतमधील काहीही दिसू नये, यासाठी कारच्या खिडक्‍यांवर काळ्या रंगाच्या फिल्म्स लावल्या जातात. विशेषत: राजकीय आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या वाहनावरच अशा प्रकारच्या फिल्म अधिक आढळतात. पिंपरी-चिंचवड शहरातही असा प्रकार सर्रास पहायला मिळतो. याच अनुषंगाने आता राज्याचे वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगावकर यांनी आदेश काढले असून वाहनावंर काळ्या फिल्म लावणाऱ्या वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अपर पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानंतर तरी पिंपरी-चिंचवडचे वाहतूक पोलीस अशा वाहनांवर कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उच्च न्यायालयाने 24 एप्रिल 2012 रोजी खाजगी तसेच सरकारी वाहनांवरील काळ्या तसेच रंगीबेरंगी फिल्म लावण्याला बंदी घालण्यात आली होती. यानंतर सुरवातीला काही दिवस राज्यभरात पोलीसांनी कारवाई केली. परंतु अद्यापही कारच्या खिडक्‍यांवर लावण्यात येणाऱ्या काळ्या फिल्स सर्रास विकल्या आणि लावल्या जातात. उघड-उघड कित्येक कार डेकोरटर्स या फिल्स लावून देत आहेत. तब्बल सात वर्षांनंतरही वाहतूक पोलिसांना यावर आळा घालण्यात आला नसल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड सारख्या शहरात मात्र पोलिसांसह वाहनचालकांनी या नियमाला सोयीस्कर रित्या “कात्रजचा घाट’ दाखवल्याचे दिसून येत होते. नगरसेवक त्यांचे कार्यकर्ते आणि बहुतांश प्रतिष्ठित आपल्या अलिशान वाहनांच्या काचा चारही बाजूने काळ्या करुन वाहतूक पोलिसांसमोरुन रोज ये-जा करतात. विशेष म्हणजे पूर्वी केवळ वाहनाच्या साईडच्या काचा काळ्या करण्याचा प्रकार होता. आता मात्र, समोरची मुख्य काचही विशिष्ट पद्धतीने काळी करण्यात येते.

तसेच आतील काहीही दिसू नये यासाठी मागच्या काचेवर भली मोठी चित्रे लावण्यात येतात. त्यामुळे वाहनामध्ये नेमके काय आहे? याची कोणाच कल्पना येत नाही. पोलिसांच्या समोरुन अशी वाहने जात असली तरी वाहतूक पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नव्हती. या पार्श्‍वभूमिवर आता वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी पुन्हा एकदा आदेश काढले आहेत.

फक्‍त या वाहनांना आहे सूट

महत्वाच्या किंवा अति महत्वाच्या व्यक्‍तींना सुरक्षेच्या कारणास्तव झेड किंवा झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आलेल्या व्यक्‍तींच्या वाहनांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. तसेच केंद्रीय मोटार वाहन नियमांतून सूट देण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनेही काही वाहनांना विशेष सूट दिली आहे. या व्यतिरिक्‍त सर्व वाहनांना हा नियम लागू आहे. त्यामुळे आता किती वाहनांवर पोलीस कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.