दै. प्रभातच्या सातारा आवृत्तीचा पहिला वर्धापन स्नेहमेळावा उत्साहात

विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वाचकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सातारा -सायंकाळचा उत्साह, पावसाळी वातावरणाचा गारवा सनईची सुरेल साथ, आपुलकीने भारलेलं वातावरण, एक वर्षाचा जपलेला गोडवा आणि वाचक, हितचिंतक यांच्या शुभेच्छांच्या वर्षावात “प्रभात’च्या सातारा आवृत्तीचा पहिला वर्धापन स्नेहमेळावा दणक्‍यात साजरा झाला. येथील अलंकार हॉल पोलीस करमणूक केंद्राच्या हॉलमध्ये रविवारची सायंकाळ स्नेही जनांच्या शुभेच्छामध्ये चिंब झाली. अपूर्व उत्साहात झालेल्या कार्यक्रमात “प्रभात’ परिवाराचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, फायनान्स मॅनेजर रवी इंडी, प्रमुख जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, सातारा आवृत्तीचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे, व ब्युरो मॅनेजर जयंत काटे यां मान्यवरांनी हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

“प्रभात’ म्हणजे निर्भीडपणा, अन्यायावर प्रहार, सत्याची कास आणि समाजमूल्ये जपणारे वर्तमानपत्र असे जणू समीकरणच आहे. एखादी चळवळ त्यागातून अथवा व्रतासारखी जोपासावी ती “प्रभातनेच. ज्येष्ठ स्वातंत्र्य अग्रणी वा. रा. कोठारी यांच्या विचारांचा वसा आणि सत्त्याऐंशी वर्षांची वाटचाल करणारा प्रभात समूह पुण्यानंतर

सातारा जिल्ह्यात आश्‍वासक वाटचाल करतो आहे. अनेक वाचक जाहिरातदार एजंट आणि हितचिंतकांच्या पाठिंब्यावर प्रभात परिवाराने सातारा नगरीत भक्कमपणे पाय रोवले. अग्रगण्य वृत्तपत्र म्हणून उभ्या महाराष्ट्रात प्रभातची ख्याती आहेच. पण, अन्यायग्रस्तांच्या पाठिशी उभे राहण्याची लेखणीची ताकदही प्रभात बाळगून आहे. यासोबत “चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट’ म्हणण्याचा निडरपणाही प्रभातने तटस्थपणे जपला आहे. यासह अनेक प्रतिक्रिया स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने अनुभवास आल्या. गेल्या वर्षातील “प्रभातपरिवाराच्या चांगल्या कार्याची जणू ही पोचपावतीच. सारोळा ते रेठरे आणि म्हसवड ते पाटणचा घाटमाथा अशा उभ्या-आडव्या पसरलेल्या सातारा जिल्हयातील वाचकांनी सहभाग नोंदवत स्नेहमेळाव्याचा आनंद द्विगुणित केला.

दैनिक प्रभातला शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे सीईओ कैलास शिंदे यांनी अलंकार हॉल येथे अगत्याने हजेरी लावली. खासदार उदयनराजे भोसले, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, यांनी भ्रमणध्वनीवरून प्रभात परिवाराला शुभेच्छा दिल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीपराव येळगावकर, महेश शिंदे, नगरसेवक धनंजय जांभळे, भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी, पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी उपस्थिती नोंदवत प्रभात परिवाराशी असणारा स्नेह वृद्धिंगत केला.

Leave A Reply

Your email address will not be published.