महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाईल ठेऊन ‘तो’ काढायचा व्हिडीओ

आयटी कंपनीमधील प्रकार : ऑफिसबॉय विरोधात गुन्हा

पिंपरी – हिंजवडी येथील एका सॉफ्टवेअर कंपनीतला ऑफिसबॉय महिलांच्या स्वच्छतागृहात गुपचूप मोबाईल ठेवायचा आणि वॉशरूममध्ये येणाऱ्या महिलांचे व्हिडिओ चित्रित करायचा. ही गोष्ट एका महिला कर्मचाऱ्याला लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली असून या ऑफिसबॉयच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास अंकुशराव घाडगे (मुळ रा. परभणी) असे या ऑफिसबॉयचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच विकास फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथकही रवाना झाले आहे. विकास घाडगे हा हिंजवडी, बाणेर येथील प्रेशंट टेक्‍नॉलॉजीज प्रा.लि. या सॉफ्टवेअर कंपनीत ऑफिसबॉय म्हणून काम करत होता. ऑफिस बॉय म्हणून काम करताना तो महिलांच्या वॉशरुमची स्वच्छता करण्यासाठी जात होता. या दरम्यान तो वॉशरुममधील पीओपी टाईल्समध्ये मोबाईल व्हिडिओ मोडमध्ये ऑन करून ठेवायचा.

शुक्रवारी (दि.14) रोजी साडेदहा वाजताच्या सुमारास कंपनीमध्ये काम करणारी एक महिला वॉशरुममध्ये गेल्यानंतर तिला वॉशरुममधील पीओपी टाईल्सच्या फटीमध्ये विकासचा मोबाईल दिसला. त्यावेळी हा प्रकार समोर आला. दरम्यान याबाबत महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर विकास घाडगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.