मंथन – तत्वनिष्ठ, संवेदनशील नाटककार (भाग १)

मानवेंद्र उपाध्याय, समीक्षक

तत्त्वचिंतक नाटककार, दिग्दर्शक आणि संवेदनशील कलावंत गिरीश कर्नाड यांची एक्‍झिट ही साहित्य आणि नाट्यविश्‍वासाठी अत्यंत दुःखद घटना होय. पौराणिक आणि ऐतिहासिक कथांमधून तत्कालीन व्यवस्थेचा शोध घेणारा अत्यंत अभ्यासू नाटककार हीच कर्नाडांची खरी ओळख. जाणकारांशी चर्चा करून विषय समजून घेऊन मगच नाटक लिहायला घ्यायचे, हा शिरस्ता पाळणारे कर्नाड देशविदेशात ख्यातकीर्त ठरले. आपल्या भोवतालाविषयी रोखठोक भूमिका मांडणाऱ्या या नाटककाराच्या जाण्यामुळे खऱ्या अर्थाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

ज्ञानपीठ विजेते नाटककार आणि अत्यंत संवेदनशील कलावंत गिरीश कर्नाड यांच्या निधनाच्या बातमीने देशभरातील साहित्यकर्मींना आणि रंगकर्मींना अस्वस्थ केले. कर्नाड यांची साहित्यसंपदा हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख. अफाट प्रतिभेचे वरदान लाभलेल्या गिरीश कर्नाड यांनी देश-विदेशात मिळविलेला लौकिक हा त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेचा आणि संवेदनशीलतेचाच परिपाक होय. साहित्य, संस्कृतीबरोबरच सामाजिक क्षेत्रातही ते सक्रिय राहिले. ययाती, हयवदन, तुघलक, नागमंडलम्‌ यासारखी त्यांची नाटके त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट करणारी आहेत.

नाटके आणि चित्रपटांच्या क्षेत्रात त्यांचा दबदबा होताच; पण आपल्या भोवतालात घडणाऱ्या घटनांविषयी त्यांनी वेळोवेळी रोखठोक भूमिका घेतली. विचारांमधील स्पष्टताच कलावंताला खऱ्या अर्थाने समृद्ध करते, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गिरीश कर्नाड. आज मनोरंजनविश्‍वाचा मोठा हिस्सा विचारशून्य आणि सवंग बाबींनी व्यापलेला आपण पाहतो, तेव्हा कर्नाड यांच्यासारख्या व्यक्तींचे आपल्यातून निघून जाणे हे केवढे मोठे नुकसान आहे, हे आपल्याला अधिक ठळकपणे जाणवते. स्वार्थ आणि स्पर्धेने ग्रासलेल्या जगात तत्त्वनिष्ठांची कमतरता जाणवत असताना कर्नाड यांच्यासारख्या व्यक्तींची एक्‍झिट अत्यंत दुःखद ठरते.

ज्ञानपीठ पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, कालिदास सन्मान, यासह दहा राष्ट्रीय पुरस्कार, कर्नाटक सरकारचे सहा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार तसेच दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांसाठी पाच फिल्मफेअर पुरस्कार असे असंख्य सन्मान ज्यांच्याकडे चालून आले, त्या कर्नाडांचा संपूर्ण जीवनपट सच्च्या कलावंतांसाठी आदर्श आहे. कोकणी भाषिक परिवारात 19 मे 1938 रोजी माथेरान येथे गिरीश कर्नाड यांचा जन्म झाला. 1958 मध्ये त्यांनी धारवाडमधून पदवी मिळविली. इंग्लंडमधील ऑक्‍सफर्ड विद्यापीठाशी संलग्न लिंकॉन आणि मॅग्‌डेलन महाविद्यालयांमधून त्यांनी तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. शिकागो विद्यापीठाशी संलग्न फुलब्राइट महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. मात्र साहित्यनिर्मिती करताना त्यांनी इंग्रजीची किंवा कोंकणी या मातृभाषेची निवड न करता कन्नड भाषा निवडली.

नाटककार हीच कर्नाडांची पहिली ओळख. त्यांच्या नाटकांचे इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आणि प्रगल्भ नाटककार म्हणून ते जगभरात ओळखले जाऊ लागले. ऐतिहासिक किंवा पौराणिक कथांमधून तत्कालीन व्यवस्थेचे दर्शन घडविणारे नाटककार म्हणून कर्नाड ओळखले जातात. वंशवृक्ष या कन्नड चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक कन्नड आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शित केले आणि अभिनयही केला. जीवनमुक्त, अमरजीत आणि इकबाल हे त्यांचे बहुचर्चित चित्रपट ठरले. तुघलक, ययाती याबरोबरच तलेदंड या त्यांच्या नाटकाचीही खूप चर्चा झाली. रक्तकल्याण या नावाने त्याचे हिंदी भाषांतर रामगोपाल बजाज यांनी केले आणि इब्राहिम अलकाजी तसेच नंतर अरविंद गौड यांच्या दिग्दर्शनाखाली त्याचे 150 हून अधिक प्रयोग झाले. नागमंडल हे नाटक तर देशातील आघाडीच्या अनेक दिग्दर्शकांनी मंचावर आणले.

आपल्यावर आपल्या आईचा मोठा प्रभाव असल्याचे गिरीश कर्नाड नेहमी सांगत. त्यांच्या आईचा आधी बालविवाह झाला होता. एका मुलाच्या जन्मानंतर ती विधवा झाली. मुलाच्या संगोपनासाठी तिने नर्स म्हणून काम सुरू केले. नंतर कर्नाड यांच्या वडिलांशी तिचे लग्न झाले आणि या दाम्पत्याला दोन मुले झाली. तीनही मुले एकत्रितपणे लहानाची मोठी झाली. आईचा जीवनसंघर्ष कर्नाडांची प्रेरणा ठरला. लहानपणी प्रसिद्ध व्यक्तींची चित्रे रेखाटण्याचा आणि ती त्याच व्यक्तींना पाठवण्याचा छंद कर्नाडांना होता. त्या मोबदल्यात ते त्या प्रसिद्ध व्यक्तीची स्वाक्षरी मागवत असत. आयरिश लेखक शॉन ओ केसी यांचे त्यांनी असेच चित्र रेखाटले आणि त्यांना पाठवून स्वाक्षरी मागितली. त्यांनी कर्नाडांना पत्र लिहून कळवले की, स्वाक्षऱ्या जमा करण्यात वेळ न घालवता असे काहीतरी कर, ज्यामुळे लोक तुझी स्वाक्षरी मागतील. कर्नाड यांचे आईवडील दोघांनाही नाटकाची आवड होती. नेहमी फिरतीवर असणारे वडील घरी आल्यावर नाटकाचा विषय नेहमी होत असे. नाटक किती प्रभावी माध्यम आहे, हे कर्नाडांना याच गप्पांमधून समजत गेले.

मंथन – तत्वनिष्ठ, संवेदनशील नाटककार (भाग २)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here