पालकमंत्र्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांची फसवणूक, पाणीकपातीवरून कॉंग्रेसचा हल्लाबोल

पिंपरी-चिंचवडला दुजाभावाची वागणूक; पाणी कपात रद्द करा

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाच्या ढिसाळ नियोजनामुळेच शहरावर दिवसाआड पाणी कपातीची वेळ आली आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. पाणीकपात करणार नसल्याचे आश्‍वासन मोडीत काढत, शहरात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट हे पिंपरी-चिंचवडला दुजाभावाची वागणूक देत असून ही नागरिकांची फसवणूक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही पाणीकपात त्वरित रद्द करण्याची मागणी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या दुजाभावाचा आरोप केला आहे. पुणे शहराच्या पाणपुरवठ्यात कपात न करण्यासाठी आग्रही आहेत. त्याकरिता धरणांमधील मृत पाणीसाठादेखील वापरण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांच्या या कृतीवरून ते केवळ पुणे शहराचे पालकमंत्री असल्याचे स्पष्ट होते. पुण्यालगतचे पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील जनतेला पाणी मिळते की नाही, याचे त्यांना काही देणे -घेणे नसल्याचा आरोप साठे यांनी केला आहे.

तर मारुती भापकर यांनीदेखील सत्ताधारी भाजपवर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फेब्रुवारी 2019 च्या सुरुवातीला शहरात पाणी कपात केली जाणार नाही, असे महापौर जाधव यांनी जाहीर केले होते.

तसेच मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी पुढाकार घेऊन पवना धरणातील सन 2016 मध्ये लोकसहभागातून 35 हजार क्‍युबिक मीटर, सन 2017 मध्ये 49 हजार क्‍युबिक मीटर तर सन 2018 मध्ये 43 हजार क्‍युबिक मीटर गाळ काढला, असा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे धरणात दीड टीएमसी पाणीसाठा वाढला, असा दावा सन 2019च्या लोकसभा निवडणूक प्रचारात करण्यात आला होता. तर मग यावर्षी दिवसाआड पाणी कपातीची वेळ महापालिका प्रशासनाला का आली? असा सवाल उपस्थित केला आहे.

राजकीय हेतूने प्रेरित होऊन खोटे बोलून सेना-भाजप पदाधिकाऱ्यांनी नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.