देशाचे लष्कर ही मोदींची खासगी मालमत्ता नाही – राहुल गांधी

मसुद अझरला कोणी सोडले?
राहुल यांचा मोदींवर घणाघात; भाजपला उद्धवस्त केले असल्याचा दावा
नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मोदींचा राष्ट्रवादाच्या नावाने सुरू असलेला प्रचार आणि दहशतवादाच्या विरोधातील भूमिका यावरून घणाघाती टीका केली. भारतीय लष्कर हे मोदींची खासगी मालमत्ता नाही असे ते म्हणाले. मसुद अझर प्रकरणात मोठा डांगोरा आज एनडीएचे लोक पिटत असले तरी मसुद अझरला पाकिस्तानात कोण सोडवून आले असा सवाल करीत त्यांनी एनडीएला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसने या निवडणूकीत चमकदार कामगीरी केली असून आम्ही भाजपला उद्धवस्त केले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोदी व भाजपचे सर्व प्रचाराचे मुद्दे खोडून काढत त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की दहशतवाद हा मोठा विषय आहे. मोदींपेक्षा आम्ही अत्यंत प्रखरपणे दहशतवादाचा मुकाबला करू आणि आम्ही या आधीही तितक्‍याच कडकपणे दहशतवादाला प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही एकही दहशतवादी पाकिस्तानात जाऊन पोचवून आलेलो नाही पण त्यांनी मसुद अझरला पाकिस्तानात सोडले होते असे ते म्हणाले. राहुल म्हणाले की युपीए सरकारच्या काळातही पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते पण आमच्या काळात लष्कराने केलेल्या हल्ल्यांचा उल्लेख व्हिडीओ गेम असा करून मोदींनी लष्कराचा अवमान केला आहे. मसुद अझरला कारागृहातून सोडून एनडीएनेच दहशतवादाशी तडजोड केली आहे त्यांच्यापुढे नांगी टाकली आहे असे ते म्हणाले. केंद्रात वाजपेयी यांचे सरकार असताना विमान अपहरण प्रकरणानंतर भाजप सरकारने मसुद अझर आणि त्याच्या दोन साथीदाराची कारागृहातून सुटका करून विशेष विमानाने कंदहारला पोचवण्यात आले होते त्याचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी मोदींची आज कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

भारताची तिन्ही सशस्त्र दले ही आपली जणू काही व्यक्तीगत मालमत्ता आहे अशा थाटात मोदींनी त्यांच्या आडून राजकारण केले. त्यांच्या यशाचा स्वताच्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी वापर करून घेतला. आम्हीही आमच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राईक केले पण आम्ही त्याचा गवगवा केला नाही कारण हे लष्कराचे यश आहे. पण आमच्या काळात झालेल्या सर्जिकल स्ट्राईकची खिल्ली उडवून मोदींनी भारतीय लष्कराचाच अवमान केला आहे. लष्कराने काय केले हे सांगण्यापेक्षा त्यांच्या सरकारने बेरोजगार, शेतकरी आणि महिलांसाठी काय केले हे त्यांनी सांगावे असे आव्हानही त्यांनी दिले. बेरोजगारी, भ्रष्टाचार आर्थिक स्थिती या विषयी मोदींनी आपल्याशी कुठेही जाहीर चर्चा करावी असे आव्हान त्यांनी पुन्हा एकदा दिले. ते म्हणाले की मोदींचा कोठेही सामना करण्यास मी तयार आहे फक्त अनिल अंबानी यांचे घर सोडून असे ते म्हणाले. मोदी यांनी उद्देशून त्यांनी आज पुन्हा चौकीदार चोर हेै हे विधान केले. ते म्हणाले की या प्रकरणी मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली आहे मोदींची नव्हे. कोर्टाने हे विधान केलेले नाही चुकुन मी ते वाक्‍य कोर्टाच्या तोंडी घातले होते ती माझी चुकच होती त्याबद्दल मी कोर्टाची माफी मागितली आहे असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगावरही त्यांनी यावेळी टीका केली. विरोधकांच्या बाबतीत निवडणूक आयोग पक्षपातीपणा करीत आहे असा आरोप त्यांनी केला.


भाजप पराभूत होणार
यावेळी केंद्रात सत्ता परिर्वतन होऊन भाजप पराभूत होणार असल्याचा विश्‍वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले या निवडणुकीत भाजप पराभूत होणार असल्याचे आमचे अंतर्गत ऍसेसमेंट आहे. आम्ही भाजपला उद्धवस्त केले आहे असा दावाही त्यांनी केला. कॉंग्रेस व विरोधकांनी केलेल्या प्रचारापुढे मोदींचा टिकाव लागलेला नाही. त्यामुळे भाजपच्या प्रचाराच्या गोटात गोंधळाचेच वातावरण असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले. पंतप्रधान सध्या घाबरलेले दिसत आहेत. विरोधकांच्या माऱ्यापुढे त्यांचा टिकाव लागेनासा झाला आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.